पवन नगर भाजीमार्केटला पाच रुपये शुल्क बंद करण्याचे आदेश; आयुक्तांची भाजी बाजाराला भेट

सिडको (जि.नाशिक) : पवननगर भाजी मार्केट येथे सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडत असल्याने याठिकाणी त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जिजामाता भाजी मार्केटमध्ये भेट देत भाजी विक्रेत्यांशी चर्चा केली. मंगळवारी (ता.३०) पोलिस व मनपा प्रशासनाच्यावतीने पवननगर येथील भाजी मार्केट येथे पाच रुपये प्रवेश शुल्क आकारून एकाच प्रवेशद्वाराने नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी प्रवेश दिला जात होता. दरम्यान, यावेळी प्रवेश शुल्काची पावती घेण्याकरिता नागरिकांना प्रमाणात रांगेत ताटकळत उभे राहावे लागले होते. 

पाच रुपये प्रवेश शुल्क बंद
मनपातर्फे भाजी बाजारात आलेल्या नागरिकांना झटपट पावती देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते. यामुळे बाजारात कमी तर पावती घेण्यासाठीच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याचे चित्र होते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने आयुक्त दीपक पांडे यांनी बुधवारी (ता.३१) सायंकाळी नागरिक तसेच भाजी विक्रेत्यांची चर्चा करून पाच रुपये प्रवेश शुल्क बंद करणार असल्याचे सांगितले. तसेच भाजी खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक छापील पावती देऊन त्यावर प्रवेश करण्याची वेळ असणार आहे.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

संबंधितांवर दंडात्मक कारवाई

एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या वेळी आयुक्त पांडे यांनी भाजी बाजारातून भाजी खरेदी देखील केली. या वेळी उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर, वाहतूक शाखेचे निरीक्षक सुभाष पवार, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह मनपा कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण