‘पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते; असे का म्हणाल्या चित्रा वाघ?

नाशिक : "लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन" असे आव्हान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. किशोर वाघ यांनी बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. 

2016 मध्ये किशोर वाघ यांना लाच घेताना अटक

भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च ईत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली. किशोर वाघ यांच्याकडे असणारी ही अपसंपदा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतकी आहे. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) आणि 13(1)E या कलमांतर्गत 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईदीच्या दिवशी शरद पवार यांनी मला व पतीला बोलावलं.

''पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ५ जुलै २०१७ ला माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ईदीच्या दिवशी ७ जुलैला शरद पवार यांनी बोलावलं. माझ्याकडे पंचनाम्याची, एफआयआरची कॉपी मागितली. ती पाहिली आणि त्यांनी सांगितले की, चित्रा, तुझा नवरा यात कुठेच नाही, '' असे सांगत खुद्द शरद पवार यांनी माझा पती निर्दोष असल्याचे सांगितल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले.

हेही वाचा > ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल'';...

माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही
चित्रा वाघ नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे प्रहार केले. 'ते प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचे आहे की, माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. तो त्या ठिकाणी नव्हताच. कृपया माझ्या नवऱ्याला कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाहीत', असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.

चित्रा वाघ यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान
या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सध्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असणाऱ्या चित्रा वाघ यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान अशी काहीशी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांच्या पतीची ही खुली चौकशी त्या आत्ता ज्या पक्षात आहेत त्या भाजपची राज्यात सत्ता असतानाच सुरु करण्यात आली होती. याच प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची तेव्हा चर्चाही रंगलीही होती.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टोला 
आता हे सरकार आले. २०११ पासूनच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कितीतरी प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत हे मी जबाबदारीने सांगते, अजूनही कोणावर केस दाखल झालेली नाही असे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणात असलेला मुख्य आरोपी गांधी हॉस्पिटलचा सुपरिटेंडेंट डॉ. गजानन भगत याची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करत आहेत, वा रे वा... वा गृहमंत्री, तुम्हाला तर तिनदा सॅल्युट... असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टोला हाणला.