पहाटेचा अग्नितांडव! गाढ झोपेत असतांनाच उठले आगीचे लोळ; काही मिनिटांतच संसाराची राखरांगोळी

मालेगाव (नाशिक) : पहाटेची वेळ...संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते. अचानक चटके बसू लागल्याने सगळे खडबडून जागे झाले. अन् काही कळायच्या आतच सुरु झाला अग्नितांडव. एका मागून एक तब्बल अठरा कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी. वाचा नेमके काय घडले?

कुटुंबिय झोपेत असतांनाच अचानक अग्नीतांडव...

रमजानपुरा भागातील संजरी चौकाजवळ असलेल्या गट नंबर २२४/१ मधील झोपड्यांना शनिवारी (ता. २८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. आगीत एकापाठोपाठ एक अशा तब्बल २१ झोपड्या जळाल्या. यात १८ झोपड्या पुर्णपणे खाक झाल्या. तर ३ झोपड्यांमधील संसार व इतर वस्तुंना बाधा पोचली. कुटुंबिय झोपेत असतानाच अचानक अग्नीतांडव सुरु झाल्याने मोठा गोंधळ उडाला. आगीत नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तु, कपडे, धान्य, टीव्ही यासह संपुर्ण संसार भस्मसात झाला. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते. दरम्यान येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. नुकसानीचा पंचनामा नोंदविण्याचे काम सुरु असून अंदाजे पन्नास लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

प्रत्येकजण आपला जीव वाचवत घराबाहेर

संजरी चौकातील नागरिकांसह संपुर्ण शहर गाढ झोपेत असताना पहाटे अडीचच्या सुमारास मोहंमद सलीम यांच्या घराला सुरवातीला आग लागली. आगीचे चटके बसू लागताच झोपेतील कुटुंब जागे होऊन आरडाओरड करत बाहेर पळाले. काही कळण्याच्या आतच त्यांच्या संपुर्ण घराला आगीने कवेत घेतले. आरडाओरड करत त्यांनी आजूबाजूच्या लोकांना उठविले. दरम्यानच्या काळात एकापाठोपाठ एक घराला आगीने वेढत अक्षरश: अग्नीतांडव सुरु केला. लाकडी फळ्या व पञ्याची घरे असल्याने आग झपाट्याने पसरली. नागरिकांना घरातील साहित्य काढण्यास थोडीही संधी मिळाली नाही. प्रत्येकजण आपला जीव वाचवत घराबाहेर पळाला. गोंधळलेल्या नागरीकांना नेमके काय करावे हेच सुचत नव्हते.
आगीचे लोळ आकाशात दिसू लागल्याने जवळच असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील कामगार धावून आले.

साडेतीन तासांनी आग आटोक्यात

लहान मुले व महिलांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. अग्नीतांडव सुरु असतानाच रमजानपुरा पोलिस ठाण्याची पेट्रोलिंगची गाडी या भागातून जात होती. त्यांनी अग्निशमन दलाला सव्वातीनच्या सुमारास माहिती कळविली. दलाचे बंब तातडीने घटनास्थळी पोचले. तोपर्यंत आगीने जवळपास दहा घरांना वेढा घातला होता. अग्निशमन विभागप्रमुख संजय पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सात बंबांच्या मदतीने १५ फेऱ्या करत साडेतीन तासात आग आटोक्यात आणली. कृषीमंत्री दादा भुसे, महापालिका आयुक्त ञ्यंबक कासार, महापौर ताहेरा शेख, उपायुक्त कमरुद्दीन शेख, तहसिलदार चंद्रजीत राजपूत आदींसह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्री. भुसे यांनी पिडीत कुटुंबियांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. आगीत १८ घरे पुर्णपणे जळाल्याचे तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

यांची घरे झाली आगीत भस्मसात

अजमल हयातनिसा अहमद, शहा मोहंमद शेख मस्तान मोमीन, रेहाना शेख खुर्शीद, सोगरा मोहंमद सिद्दीक, साबीया मोहंमद इस्माईल, अर्जिजुर रहेमान रियाज अहमद, मोहंमद अजिज अब्दुल अजिज, मोहंमद हसन बद्रुजा, अब्दुल हमीद बुद्रुजा, स्वालेहा बानो मोहंमद इलियास, विरामिल्लत अब्बास पिंजारी, नसीमबानो सलीम अहमद, महेरुन्निसा मोहंमद सुलेमान, रियाज अहमद मोईनोद्दीन, खैरुन्नीसा रज्जब अली, एकबाल मोहंमद सलीम, मोहम्मद अमीन मोहंमद दानीश, शाहीद अख्तर अब्दुल रशीद, मोहंमद मुनीर मोहंमद इस्माईल, खैतुजा मोहंमद याकुब.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

माझ्या मुलीचा विवाह २ जानेवारीला होता. विवाहासाठी ८० हजार रुपयांचे दागिने आणून ठेवले होते. तसेच नव्वद हजार रुपयाच्या लग्नासाठी संसारोपयोगी वस्तू व जेवणासाठी तांदुळही आणून ठेवले होते. आगीत सर्व भस्मसात झाले. आता आम्हाला कोण मदत करणार? एवढे पैसे आणायचे कोठून? मुलीचे लग्न कसे करायचे? - नुकसानग्रस्त

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली