नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहरामध्ये गंभीर इजा झालेल्या प्राणी आणि पक्षांच्या उपचारासाठी पुणे- मुंबईला जावे लागत असल्याने बहुतांश वेळा विलंब झाल्याने प्राणी, पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागत होते. मात्र, आता नाशिकमध्येच म्हसरुळ येथे वन्यप्राणी उपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे. राज्यात माणिकडोह, बावधन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यानंतर उत्तर महाराष्ट्रात पहिलेच उपचार केंद्र नाशिकमध्ये झाले आहे. त्यामुळे इजा झालेल्या पक्षी, वन्यप्राणी यांना उपचारासाठी पुणे-मुंबईकडे न जाता नाशिकमध्येच उपचार सुलभ होणार आहे.
- १५ अत्याधुनिक कक्षांचा समावेश, जखमी प्राण्यांना मिळणार त्वरित उपचार
- उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी उपचार केंद्रास नाशिकमध्ये प्रारंभ
- हे केंद्र चालविण्यासाठी पुणे येथील रेक्सू चॅरिटेबल ट्रस्ट यांनी करार केला आहे.
म्हसरुळ येथील वनोपज आगारामध्ये प्रतिबंधीत अडीच एकरमध्ये पश्चिम भाग, नाशिक वनविभागाकडून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे उपचार केंद्र उभारले आहे. नाशिक व इतर परिसरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांनी ज्या वन्यजीवांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यांना या अपंगालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक पश्चिम भागच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांनी माहिती दिली. हे केंद्र चालविण्यासाठी पुणे येथील रेक्सू चॅरिटेबल ट्रस्ट यांनी करार केला आहे.
दरम्यान पश्चिम भाग, नाशिक विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक उपवनसंरक्षक अनिल पवार यांनी वेळोवेळी या केंद्राबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता. तसेच उपचार केंद्र कसे असावे, उपचार केंद्रामध्ये वन्यजीवांसाठी पक्ष्यांसाठी कोणत्या सुविधा असाव्यात याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. सस्तन वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी जखमी झाल्यावर त्यांच्यावर उपचाार करण्यासाठी या उपचार केंद्रावर २४ तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहे. रेक्सू चॅरिटेबल ट्रस्टचे विभागप्रमुख अभिजीत महाले, व्यवस्थापक वैभव भोगले, आयुष पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमराज सुखवाल, राकेश मोरे, मनोज वागमारे, समर्थ महाजन आदी काम बघत आहेत.
विलगीकरण कक्ष
संसर्गबाधीत प्राणी आणि पक्षी यांना उपचारासाठी केंद्रावर आणल्यानंतर इतर प्राणी, पक्ष्यांना संसर्ग होऊ नये यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.
हेल्पलाईन क्रमांक
जर शहरात कोणताही प्राणी पक्षी असे काही इजा झालेले असल्यास नागरिकांनी ८६९८११२२११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पश्चिम भाग, नाशिक विभाग यांनी केले आहे.
या आहेत सुविधा
या वन्यप्राणी उपचार केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता कक्ष, एक्स रे, एमआरआय, औषधालय, निरीक्षण कक्ष, स्वयंपाकालय यांसह वैद्यकांची एक सुसज्ज अशी टीम आहे. तसेच वन्यजीवांमध्ये वाघासाठी १, बिबट्यांसाठी ४, लांडगे- कोल्हे यांच्यासाठी ५, माकडांसाठी २ यासह १५ कक्षांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा: