‘पहिले ॲक्शन बाद मे सेक्शन’मुळेच शेतकऱ्यांना न्याय; तब्बल १७ कोटी मिळाले परत

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीबाबत पोलिस गंभीर आहेत. सप्टेंबरपासून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे फसलेले १७ कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. तसेच या काळात शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी दिलेला एकही धनादेश बाउन्स झालेला नाही. आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात कलमाचा विचार करीत राहिल्यास शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळणार नाही. त्यामुळेच ‘पहिले ॲक्शन बादमे सेक्शन’ ही भूमिका घेतल्यामुळेच शेतकरी फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली. 

‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी फसवणुकीच्या कारवाईसंदर्भात डॉ. दिघावकर म्हणाले, की मी मूळचा कसमादेचा भूमिपुत्र असल्याने येथील शेतकऱ्यांच्या व्यथा मी बालपणापासून जाणून आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याला मी प्राधान्य दिले. ५ सप्टेंबर ते २४ फेब्रुवारीदरम्यान एकही शेतकऱ्याचा धनादेश बाउन्स झालेला नाही. तसेच शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांनी बुडविले १७ कोटी रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. केवळ मीच नव्हे, तर माझ्या सहकाऱ्यांचा यात मोठा सहभाग आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील शेतकरी फसवणुकीचे प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

बेरोजगार फसवणुकीच्या ३२ टोळ्या 

उत्तर महाराष्ट्रात आणखी एक शेतकरी फसवणुकीचा प्रकार आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या टोळ्या या भागात सक्रिय असल्याचे लक्षात आले. अशा बेरोजगारांना फसविणाऱ्या ३२ टोळ्यांकडून एक कोटी हस्तगत करून ते ज्या त्या शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक सहन करणार नाही, पोलिस दलात मी ३४ वर्षांपासून कार्यरत आहे. नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मी माझ्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावून त्यांच्या साक्षीने गोरगरीब कष्करी शेतकऱ्यांप्रति बांधिलकी मानून काम करतोय. त्यामुळे मातीशी नाळ तुटलेली नाही. आज मागे वळून पाहताना त्याचे समाधान वाटते. 

बागलाण तालुक्यात ५० केटीवेअर 

मी कसमादे भागातील आहे. नाशिकचा भूमिपुत्र आहे. लहानपासून या भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. अखेरच्या टप्प्यात या भागासाठी काही तरी वेगळे काम करण्याचे नियोजन आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून ५० केटीवेअर बंधारे बांधण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाविषयी डॉ. दिघावकर म्हणाले, की बागलाण तालुक्यात आदर्श जलसिंचनाचा प्रकल्प साकारण्याचे ध्येय आहे. त्यात ५० कोल्हापूर टाइपचे बंधारे बांधून सिंचनाचा आदर्श पॅटर्न उभारण्याचे नियोजन आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

आठवडाभरात अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या 

उत्तर महाराष्ट्रात पोलिस दलातील ड्यूटीवर असताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या वारसांना आठ दिवसांत अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात नोकऱ्या देऊन सामावून घेतले जाणार आहे. पाचही जिल्ह्यांत जाऊन मी स्वत: नेमणूक पत्र देणार आहे.