पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह, दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! खासगी लॅबचा रुग्णांच्या जिवाशी खेळ

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढला असून, भितीमुळे नागरिक रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घेत आहेत. मात्र, लॅबकडून प्राप्त होणाऱ्या अहवालामुळे गोंधळ अधिकच वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच नागरिक बेजार झाले असताना, तपासण्या करणाऱ्या लॅबपासून ते रुग्णालयांच्या चुकांमुळे समस्या अधिकच वाढत आहे. असाच एक प्रकार लॅबच्या चुकीमुळे समोर आला आहे.  

काय घडले?

चेतनानगरमधील ७५ वर्षीय वृद्ध महिलेला अर्धांगवायुचा झटका आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्या महिलेच्या मुलला देण्यात आला. शनिवारी (ता. २७) वृद्ध महिलेचा मुलगा त्या महिलेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अपोलो रुग्णालयाशी संबंधित सुप्रिम लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

महिला २४ तास कोविड कक्षातच

२८ मार्चला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला उपचारासाठी कोविड कक्षात दाखल करण्यात आले. लक्षणे नसल्याने महिलेच्या मुलाने त्याच लॅबमध्ये दुसरी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेथे नमुना दिल्यानंतर २९ मार्चला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही संबंधित वृद्ध महिलेला २४ तास कोविड कक्षातच ठेवण्यात आले. दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये दाखल केल्याने त्या रुग्णास कोरोना झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नातेवाइकांकडून केला जात आहे.
 
अवघ्या २४ तासांत एकाच रुग्णाचा पहिला पॉझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह अहवाल येतो, ही बाब प्राणघातक आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त होऊनही कोविड कक्षातच ठेवले जाते यासंदर्भात वैद्यकीय विभागाने सखोल चौकशी करावी. 
- हेमंत अहिरे, बाधित महिलेचा मुलगा  

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...