पांढरे सोने उपटण्याची वेळ! लाल्या, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कोट्यावधींचे नुकसान

येवला (नाशिक) : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटत असून, रोगांचा प्रादुर्भाव, बेभरवशाचा बाजारभाव आणि घटणारे उत्पन्न ही त्यामागची कारणे आहेत. यंदा सततच्या पावसाने लाल्या, तर आता बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पहिल्या व दुसऱ्या वेचणीचा कापूस संपला असून, कापूस उत्पादकांना नाइलाजाने शेतातील कापूस उपटून फेकत दुसरे पीक घेण्याची वेळ आली आहे. एकरी उत्पन्न घटल्याने यंदा सुमारे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. 

यंदा मालेगावमध्ये १९ हजार ४४५, सटाणा १६६, नांदगावमध्ये आठ हजार २७०, निफाडला ४२, सिन्नरला एक हजार ४२९, तर येवल्यात आठ हजार ९७५ अशा एकूण ३९ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली. दर वर्षीच्या अंदाजानुसार कपाशीच्या जिरायती क्षेत्रात पाच ते आठ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात १२ क्विंटलच्या दरम्यान ,तर सरासरी दहा क्विंटल उत्पादन निघते. एकराला सरासरी खर्च २० ते २५ हजारांपर्यंत येतो. यंदा या सरासरीत काहीशी घट होऊन पाच ते आठ क्विंटल, तर सरासरी सहा क्विंटल उत्पादन मिळाले. सुरवातीला पावसाने कपाशी जोमाने वाढली पण फुलपत्ती अन् बोंडे लागली अन् सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने बोंडे पडली व सडली. तसेच लाल्या रोगाचा विळखा पडल्याने नवी फुलपत्ती व बोंडे आलीच नाहीत. दर वर्षी जेथे तीन ते चार वेचणी होऊन एकरी ८ ते १२ क्विंटल कापूस निघतो, तेथेच यंदा कपाशीची एकच अन् तुरळक शेतात दोन वेचणी झाल्या. एकरी फक्त चार ते आठ क्विंटल कापूस निघाला. काही शेतकरी खरिपातील कपाशीला रब्बीत पाणी देऊन फरदड घेतात. यामुळे नवी बोंडे लागून दोन ते तीन क्विंटल कापूस बोनस मिळायचा पण यंदा बोंडअळीने कपाशी उपटण्याशिवाय पर्यायच उरला नाही. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

यंदा दोन पिके 
दर वर्षी जून-जुलैत लागवड झालेला कापूस थेट फेब्रुवारी ते मार्चपर्यंत चालतो. या काळात टप्प्याटप्प्याने कापूस वेचला जातो. मात्र यंदा लाल्या व बोंडअळीने नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच कपाशीचा खेळ संपविल्याने शेतकरी हा कपाशी उपटून या शेतात गहू, हरभऱ्याचे पीक घेत आहेत. कपाशीतून झालेले नुकसान तरी या पिकातून भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. 
राज्य कापूस पणन महासंघाची मालेगावला दोन केंद्रांवर प्रतिक्विंटल पाच हजार ७२५ रुपये दराने खरेदी सुरू आहे. येवल्याच्या शेतकऱ्यांना तेथे नेऊन विक्री करणे शक्य नसल्याने गावोगावी व्यापाऱ्यांना कापूस दिला जात आहे. बोंडअळी प्रादुर्भाव व दुसऱ्या वेचणीचा कवडीमिश्रित कापूस सध्या तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल विकत असून, पहिल्या वेचणीचा साठवणूक केलेला कापूस ५०५० ते ५२५० रुपये प्रतिक्विंटल भावाने विक्री होत आहे. यामुळे कपाशीतून यंदा उत्पादन खर्चही निघणे अवघड आहे. 

असे झाले नुकसान... 
जिल्ह्यात ९७ हजार ५०० एकरांवर कपाशी लागवड झाली असून, सरासरी एकरी दहा क्विंटल कापूस निघून ४९७ कोटींचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र यंदा केवळ सरासरी सहा क्विंटलच कापूस निघाल्याने २९८ कोटींच्या आसपास उत्पन्न निघणार आहे. यामुळे सुमारे २०० कोटींचा फटका एकट्या पांढऱ्या सोन्यातून बसणार आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

सुरवातीला अतिपावसामुळे हलक्या जमिनीतील कापूस लाल्या रोग व करपा रोगाने नष्ट झाला, तर बागायती कापसाला दुसऱ्या वेचणीला बोंडअळीने जास्त नुकसान केले. दिवाळीनंतर प्रत्येक कैरीमध्ये अळी असल्याने दुसऱ्या वेचणीची गरजच उरली नाही. यंदा एकरी तीन ते सहा क्विंटल उत्पन्नात घट झाली असून, कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. 
-भागुनाथ उशीर, प्रगतिशील शेतकरी, सायगाव