पाऊस व गारपिटच्या शक्यतेने द्राक्षपंढरी हादरली; शेतकऱ्यांची धावपळ

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : उत्तरेकडील शीतयुक्त वारे व पश्चिमेकडील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र एकत्र येत असल्याने हवामान खात्याने तीन ते चार दिवस पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविली. यामुळे निफाड तालुका अर्थातच द्राक्ष पंढरी या शक्यतेमुळे हादरली आहे.

द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता

गुरूवार पासूनच वातावरणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी मात्र पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात हवामान खात्याच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे या सर्व शक्यतामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी काळी जातीच्या द्राक्ष पिकांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे या द्राक्ष पिकावर थंडी व पाऊसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर परिसरात मोठ्या प्रमाणात शेवटचे द्राक्षबागा या फ्लोरिंग स्टेजमध्ये असून काही द्राक्षबागा दोड्यांमध्ये आहे.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले

पाऊस किंवा गारपीट झाल्यास याही द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे अगोदरच मागील वर्षी कोरोनाव्हायरस च्या धर्तीवर लॉकडाउन काळात शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये द्राक्ष विकावी लागली त्यामूळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.चालू वर्षी मात्र सुरुवातीच्या काळात द्राक्ष पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने शेवटचे द्राक्ष प्लॉट सोडले तर सुरुवातीचे द्राक्ष प्लॉट चांगल्या सुस्थितीत आहेत.आता शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडणार तोच हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले असून शेतकरी महागडी औषधे फवारणी करून द्राक्ष पीक वाचवण्याचा केवलवाणे प्रयत्न करताना दिसत आहे.

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

चिंता सर्वच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना

ढगाळ वातावरणामुळे फ्लॉवरींग मधील द्राक्ष बागांची गळ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून द्राक्ष बागायतदारांना वर चारी बाजूने संकटे ओढवली आहे आत्तापर्यंत द्राक्ष छाटणी पासून थिनींग पर्यंत मोठा खर्च होत असून निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी पेपर लावणे आवश्यक असते. मात्र चालू वर्षी लॉकडाऊनमुळे पेपर उत्पादन न झाल्याने एका किलोला 10 रुपये प्रमाणे द्राक्ष पेपर बंडल 400 रुपयांच्या पुढे निघून गेला आहे. पर्यायाने एक एकर द्राक्ष बागेला पेपर लावण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येत असुन त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांना खर्च करूनही पुढील भवितव्य काय राहील ही चिंता सर्वच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.

 

हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस पाऊस व गारपीट त्यानंतर आठ दिवस थंडी व पुन्हा पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष पीक वाचवायचे कसे हाच मोठा प्रश्न आहे- प्रकाश मोगल, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, मौजे सुकेणे-