पाच रुग्णवाढीच्या वेगामुळे प्रतिबंधित क्षेत्र वाढणार; आयुक्तांचा निर्णय  

नाशिक : महापालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्गाचा वेग पाचपटीने वाढल्याने एखाद्या इमारतीमध्ये पाच व त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जाणार आहे, तर सोसायटीमध्ये पंचवीसपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

मार्च ते सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा वेग उच्चतम पातळीवर
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मार्च ते सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा वेग उच्चतम पातळीवर होता. ऑक्टोबर महिन्यात वेग कमी होण्यास सुरवात झाली. जानेवारीत कोरोना आहे की नाही, अशी परिस्थिती होती, परंतु त्याचा फायदा घेत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरवात केली. शाळा-महाविद्यालये सुरू झाली, तर लग्नसमारंभदेखील कोरोना नियम न पाळता सुरू झाल्याने त्याचा परिणाम कोरोना वेग वाढण्यावर झाला.

फेब्रुवारीत आकडा एकदम वाढला

फेब्रुवारीत कोरोना रुग्णांचा आकडा एकदम वाढला. ७ फेब्रुवारीला शहरात साडेपाचशे रुग्ण होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. ७ मार्चला तब्बल पाचपटीने रुग्ण वाढल्याने पालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट झाला असून, त्यादृष्टीने विविध उपाययोजना योजल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिबंधित क्षेत्रांची रचना करण्यात आली आहे. पाच रुग्ण इमारतीत आढळल्यास व सोसायटीमध्ये पंचवीसपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले जाणार आहे. 

मेडिकलवर राहणार वॉच 
सर्दी, खोकला, ताप आल्यास नागरिक मेडिकलमधून औषधे घेतात. वास्तविक नागरिकांनी रुग्णालयात जाऊन स्वॅब टेस्टिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा नेमका आकडा लक्षात येत नसल्याने मेडिकलवरदेखील वॉच ठेवला जाणार आहे. सर्दी, खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देता येणार नसल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. 

मुख्यालयात तिघांनाच प्रवेश 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात तिघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विभागात काम असेल, त्या विभागप्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांना ऑनलाइन तक्रारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. पदाधिकाऱ्यांसमवेत फक्त तिघांनाच प्रवेश दिला जाईल.