पाच रुपये द्या अन्‌ उडवा नियमांचा फज्जा! बाजार समितीत जाण्यासाठी उसळतेय मोठी गर्दी

पंचवटी (नाशिक) : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाच रुपयांच्या तिकिटाची मात्रा लागू केली आहे. परंतु पाच रुपये देऊन दिंडोरी रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर समितीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी तिकीटबारीवरच मोठी गर्दी उसळत असून, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत असल्याने प्रशासनाला कोरोनामुक्ती हवी की पैसे, हा प्रश्‍न पडतो. 

बुधवारी (ता. ३१) मोठ्या प्रमाणावर कृषिमाल येण्याची शक्यता गृहीत धरत बाजार समितीच्या आवारात जाण्यासाठी एकच गर्दी केली, विशेष म्हणजे मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सोडा, अनेक जण मास्क तोंडाच्या खाली घेऊन चक्क एकमेकांशी गप्पा मारत तिकीट आकारणीबाबत संबंधितांची टर उडवत असल्याचे दिसून आले. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

 जागोजागी उसळतेय गर्दी

नाशिक बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याची ख्याती असल्याने नाशिक तालुका परिसरासह दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी या ठिकाणहून कृषिमाल येतो. याशिवाय काही माल थेट जळगाव, धुळे, नगर या जिल्ह्यांतूनही येतो. समितीत दिवसभरात दोन वेळा लिलाव प्रक्रिया पार पडते. त्यामुळे बारा महिने या ठिकाणी शेतकऱ्यांसह व्यापारी, दलाल, अडते, किरकोळ विक्रेते, हॉटेलचालक यांची मोठी गर्दी असते. संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर समितीत नियमित स्वच्छताही केली जाते, परंतु प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असेल तर संसर्गाची भीती वाढणारच आहे. बुधवारी दुपारी समितीच्या प्रवेशद्वाराजवळ पाच रुपये देऊन प्रवेश करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला व पुरुष पाच रुपये देऊन समितीच्या आवारात प्रवेशासाठी थांबले होते. विशेष म्हणजे गर्दी एवढी होती की ते महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही जुमानत नव्हते. सायंकाळच्या सुमारासही अशीच गर्दी झाली होती. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसह अडते, दलाल, विक्रेते यांची नेहमीच गर्दी असते. परंतु वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या सर्वच घटकांना सतर्क केले आहे. 
-अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती