पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश; अतिरिक्त वेळेतील कामाचा मिळणार भत्ता

नोटप्रेस नाशिकरोड,www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोडच्या आयएसपी व नोट प्रेससह देशातील नऊ प्रेसचे महामंडळ झाले असतानाही प्रेस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील १८ महिन्यांचा ओव्हर टाईम ॲरिअर्स (अतिरिक्त वेळेत थांबून केलेल्या कामाचा भत्ता) मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या काळातील माजी तसेच विद्यमान प्रेस कामगारांना पाच ते सहा कोटीची थकबाकी मिळणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

नाशिक रोडच्या प्रेससह देशातील नऊ सरकारी प्रेसचे महामंडळात रुपांतर झालेले असतानाही प्रेस मजदूर संघाने सरकारी कर्मचा-यांप्रमाणे प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे सर्वांना पगारवाढही मिळाली. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सरकारने जुलै २०१७ मध्ये केली. २ जानेवारी १६ पासून वेतन आयोग लागू केला. त्यामुळे १८ महिन्यांची विविध प्रकारची थकबाकी निर्माण झाली होती. या थकबाकीचे पैसे प्रेस मजदूर संघाने कामगारांना मिळवून दिले. तथापी, थकबाकीतील १८ महिन्यांचा अतिरिक्त कामाचा भत्ता मिळाला नव्हता. तो मिळावा यासाठी प्रेस मजदूर संघाने महामंडळाकडे सातत्याने प्रयत्न केले. पत्रव्यवहार करून, मुख्य समितीकडे विषय मांडून, स्वतंत्र बैठका घेऊन थकबाकीचा मुद्दा पटवून दिला. मात्र, व्यवस्थापनाने निर्णय घेता येणार नसल्याचे सांगून केंद्राकडे हे प्रकरण पाठवून दिले.

मजदूर संघाने ओव्हर टाईमबाबत तपशिलात माहिती मंत्रालयाला दिली. जगदीश गोडसे यांनी अर्थ मंत्रालय, कामगार मंत्रालय व अन्य मंत्रालयाकडे विषय मांडला. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजनसिंग सिध्दू यांची मदत घेतली. पाच वर्षाच्या प्रचंड प्रयत्नांनंतर प्रेस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रंजन सिंह यांनी ओव्हर टाईमच्या थकबाकीला मंजुरी दिला. त्यांच्यासह प्रेस महामंडळाचे संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, मुख्य महाव्यवस्थापक बी. जे. गुप्ता आदींचे प्रेस मजदूर संघाने आभार मानले आहेत. जगदीश गोडसे म्हणाले की,विद्यमान व निवृत्त कामगारांनाही ओव्हर टाईमची थकबाकी मिळाल्याने ते याचा मनस्वी आनंद आहे. प्रेस कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रेस मजदूर संघ प्रयत्नशील आहे.

हेही वाचा:

The post पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश; अतिरिक्त वेळेतील कामाचा मिळणार भत्ता appeared first on पुढारी.