पाणीदार होण्यासाठी आम्हालाही योजनेत घ्या! अवर्षणप्रवणातून येवल्याला टाळल्याने नाराजी 

येवला (नाशिक) : गावे पाणीदार करण्यासाठी केंद्र सरकारची अटल भुजल योजना आता राज्यानेही लागू केली आहे. विशेषतः भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने भूजलाची गुणवत्ता सुधारत उपलब्धता वाढविण्यासाठी ही योजना प्राधान्याने राज्यात राबविली जाणार असून, जलसंधारण व भूजल पुनर्भरण हा मूळ हेतू आहे. 

योजनेत पहिल्या टप्प्यात सिन्नर व देवळा तालुक्यातील १२६ गावांचा समावेश केला. मात्र नेहमी दुष्काळी टंचाईग्रस्त व अवर्षणप्रवण असलेल्या येवला तालुक्यातील गावांचा समावेश नसून नाराजीही व्यक्त होत टंचाईग्रस्त गावांना न्याय देण्याची मागणी होत आहे. 

सिन्नर ८७, तर देवळा तालुक्यातील ४२ गावांचा समावेश

घसरणाऱ्या भूजल पातळीला आळा घालून, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जलसंधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाययोजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतू आहे. राज्यातील अतिशीत, शोषित आणि अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रातील ठराविक १३ जिल्ह्यांतील एक हजार ४४३ गावांमध्ये ते ही योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी ९२५ कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळणार आहे. या योजनेत विशेषतः पाणीबचतीची उपाययोजना व भूजल पुनर्भरण, भूजल साठ्यात शाश्वतता आणणे हा हेतू आहे. त्याच्यासाठी विविध उपक्रमही राबविले जाणार असून, जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ८७, तर देवळा तालुक्यातील ४२ गावांचा, तर दोन्ही तालुक्यांतील नऊ पाणलोट क्षेत्रांचा समावेश केलेला आहे. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

येथील एकाही गावाचा समावेश नाही

संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रथम जलअर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे. गावनिहाय जलसुरक्षा आराखडे तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती, तसेच संबंधित गावाची लोकसंख्या, पशुधन, सिंचन विहिरी, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, पीकपद्धती आदी मार्गांनी होणारे भूजल पुनर्भरण आणि उपसा आदींबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. जलसंधारण, कृषी, लघुपाटबंधारे, ग्रामविकास आदी विभागांच्या सहभागातून योजनेत सिमेंट नालाबांध, हायब्रिड गॅबियन, अस्तित्वातील कामांची दुरुस्ती, भूजल पुनर्भरण, सिस्टिम दुरुस्ती, साठवण क्षेत्रातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, मातीनाला, सिमेंट दगड, बांध आदी कामे होणार आहेत. 
सिन्नर, देवळा दुष्काळी तालुके आहेत पण येवलादेखील दुष्काळी असून, येथे प्रत्येक उन्हाळ्यात अर्धा तालुका टॅंकरवर तहान भागवतो. येथील भूजल पातळी खालावलेली आहेच, त्यातही येवला पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असूनही राज्य शासनाने योजनेत येथील एकाही गावाचा समावेश न केल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

येवल्यातील गावांचा अटल योजनेत समावेश झाला नाही याचे आश्चर्य वाटते. तालुका कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त आहेच. शिवाय पश्चिम बाजूला असलेल्या अंकाई डोंगररागांपासून गोदावरी नदीपर्यंत असलेल्या छोट्या नद्यांना पाणलोट क्षेत्र खूप कमी आहे. उत्तर-पूर्व आणि पश्चिम भागात खडकाळ रचनेमुळे पुनर्भरणही योग्य होत नाही. त्यामुळे ही योजना तालुक्यात लागू करावी. 
-भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला