पाणीपट्टीची थकबाकी शंभर कोटी पार! तीन विभागीय अधिकाऱ्यांना नोटिसा

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने काटकसरीचे धोरण अवलंबिण्याबरोबरच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांकडील वसुलीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. परंतु, अपेक्षित वसुली होत नसल्याचे दिसून येत आहे. पाणीपट्टीची थकबाकी आता शंभर कोटींच्या पुढे गेल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी तीन विभागीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

तीन विभागीय अधिकाऱ्यांना आयुक्तांची नोटीस 
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टीच्या थकबाकीसह १४७. ५७ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत फक्त ३१.४५ कोटी रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने आयुक्त जाधव यांनी सुधारित पाणीपट्टीची चालू वसुली ५०, तर थकबाकी किमान ७५ टक्के वसूल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या पूर्व, सातपूर व पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनधिकृत नळधारकांवर कारवाई करून बंद नळ जोडण्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

६५ हजार थकबाकीदार 
शहरात एक लाख ९९ हजार १६ नळजोडणीधारक आहेत. यात रहिवासी एक लाख ९१ हजार २७३, व्यावसायिक तीन हजार ८७८, अव्यावसायिक तीन हजार ८६५ याप्रमाणे नळजोडण्या आहेत. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत असलेले ६५ हजार ५८५ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडून ९३.२० कोटी रक्कम थकली आहे. एक लाख रुपयापेक्षा अधिक थकबाकी असलेले २७५ मोठे थकबाकीदार असून, त्यांच्याकडून ९.९६ कोटी रुपये वसुलीसाठी मोहीम उघडण्यात आली असून, थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी