पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने थोपटले दंड; पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना 

नाशिक : पाणीपट्टी वसुलीचे यंदाचे १२३ कोटींचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष संपुष्टात येत असतानाही दृष्टिपथात येत नसल्याने २२२ मोठ्या पाणीपट्टी थकबाकीदारांकडील दहा कोटी रुपये थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने दंड थोपटले आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी वसुलीसाठी कडक मोहीम राबविताना नळजोडण्या तोडण्याच्या सूचना दिल्या. 

अवघे २५ कोटी रुपये जमा

यंदाच्या आर्थिक वर्षात पाणीपट्टच्या थकबाकीससह १२३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने नागरिकांकडून कर अदा केला नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही घरपोच पाणीपट्टीच्या पावत्या पोचविल्या नाहीत. आता आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आढावा घेतला असता अवघे २५ कोटी रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. शहरात एक लाख ९० हजार ६७३ निवासी, तीन हजार ९०१ व्यावसायिक तर, चार हजार ७३ अव्यावसायिक असे एक लाख ९८ हजार ६४७ नळजोडणीधारक आहेत. त्यांच्याकडून अवघी २६ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. त्यामुळे सहा विभागीय अधिकाऱ्यांना चालू आर्थिक वर्षाच्या उद्दिष्टाच्या शंभर टक्के, तर थकबाकीपैकी ७५ टक्के वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

पाणीपट्टी अदा न केल्यास...

सहा विभागांत ५९ हजार ८३९ नळजोडणीधारक असून, त्यांच्याकडे ८१ कोटी १३ लाख ९० हजार रुयांची थकबाकी आहेत. यातील २२२ मोठे थकबाकीदार असून, त्यांच्याकडे दहा कोटी रुपये थकले आहेत. प्रथम मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली व्हावी. पाणीपट्टी अदा न केल्यास नळजोडणी तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

शासकीय थकबाकीकडेही लक्ष 

शासकीय कार्यालयांकडे सव्वाचार कोटींची पाणीपट्टी थकली आहे. सर्व कार्यालयांना अंतिम नोटीस बजावण्यात आली असून, नाशिक रोड व पूर्व विभागातील प्रत्येकी अठरा, पश्चिम विभागातील ७४, सिडकोतील दोन, तर पंचवटी विभागातील तीन, अशा एकूण ११५ शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..