पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप

गळा आवळून खून,www.pudhari.news

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; लूटमारीच्या उद्देशाने परिचित महिलेचा पाणी पिण्याच्या बहाण्याने गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Nashik News) बागलाण तालुक्यातील श्रीपुरवडे येथे २३ सप्टेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. आनंदा तुकाराम सोनवणे (४०, रा. वाघळे, ता. सटाणा) असे आरोपीचे नाव आहे.

तो घटनेच्या दिवशी श्रीपुरवडे येथे गेला असता त्याच्या परिचित शेणूबाई बाजीराव म्हसदे यांच्या घरी गेला. त्याने पाणी मागितले परंतु, शेणूबाई यांनी चहाची तयारी केली. त्याला ओट्यावर बसवून त्या स्वयंपाक घरात गेल्या. तेव्हा आनंदाही चोरपावलांनी मागे गेला अन‌् जनावरांना बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीने त्याने त्यांचा गळा आवळला. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्यात. त्या निपचित पडल्याचे पाहून त्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागदागिने काढून घेत पोबारा केला होता. नंतर जखमी अवस्थेतील शेणूबाई यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी त्यांनी जबाब नोंदवला हाेता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस निरीक्षक जी. डी. गर्दे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्यासमोर या प्रकरणाचे कामकाज चालले. सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिल बागले व अशोक पगारे यांनी नऊ साक्षीदार तपासले. एम. एस. फुलपगारे व एस. के. सोनवणे यांनीही प्रभावी युक्तिवाद करत गुन्हा सिद्ध केला. त्यानुसार आरोपी आनंदा साेनवणेला जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मृत फिर्यादीच्या पतीला देण्याची तजवीज ठेवली आहे.

हेही वाचा :

The post पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा गळा घोटणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.