पाण्यासाठी दोन गावांचा संघर्ष शिगेला! डोंगरगावकडून विरोध; पिंपळखुटे, भुलेगावचे शेतकरी उपोषणाला   

येवला (जि. नाशिक) : पिके करपू लागली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने डोंगरगाव धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करून पिंपळखुटे बुद्रुक व भुलेगावचे शेतकरी मंगळवार (ता. २३)पासून पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापुढे उपोषणाला बसले. त्याच वेळी डोंगरगावचेही शेतकरी पाणी सोडू नये यासाठी आक्रमक झाले असून, पाणी सोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. तसेच सायंकाळी येथे कार्यालयात येऊन पाणी न सोडण्याची जोरदार मागणी केली. 

डोंगरगाव धरण पाणीप्रश्न पेटला असून दोन्ही गावातील शेतकऱ्यांतील संघर्ष वाढला आहे. धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून चारी नादुरुस्त आहे. शिवाय डोंगरगाव ग्रामपंचायत सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर धरणातील पाण्यावर अवलंबून असून परिसरातील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे. यामुळे पाणी सोडू नये ही डोंगरगाव ग्रामस्थाची भूमिका आहे. या मागणीचा ग्रामपंचयातीचाही ठराव केला आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता पाटील व इतर अधिकारी पाणी सोडण्यासाठी मंगळवारी धरणावर आले होते. मात्र डोंगरगावच्या ग्रामस्थांनी जोरदार विरोध करून त्यांना पाणी सोडण्यापासून रोखले. २० ते २५ शेतकऱ्यांनी सायंकाळी येवला येथील कार्यालयात येऊन जोरदार विरोध करत पाणी सोडल्यास उपोषणाचा इशारा दिला. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

पिंपळखुटे बुद्रुक व भुलेगाव या भागात शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहेत. पाणी मिळत नसल्याने शेतातील कांदे, गहू व इतर पिके जळून जाण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या दमदार पावसामुळे डोंगरगाव येथील पाझर तलावात सध्या असलेले मुबलक पाणी आजूबाजूच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सध्या पाण्याअभावी या भागातील पिके करपू लागल्याने ५०० एकरातील पिके वाचवण्यासाठी डोंगरगाव पाझर तलावातील पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पिंपळखुटे बुद्रुक व भुलेगाव येथील शेतकऱ्यांनी केली. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरवात केली. 
दूध संघाच्या माजी अध्यक्ष कल्पना कुऱ्हे, पिंपळखुटे सरपंच शिवाजी पगारे, उपसरपंच अनिता पवार,  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

भुलेगावचे सरपंच कैलास साळुंखे, कुसूमबाई उंडे, साहेबराव उंडे, प्रमोद उंडे, वाल्मीक उंडे, जगन पवार, रखमा पवार, आण्णासाहेब पवार, हृषीकेश कुऱ्हे, दिगंबर आढाव, रामभाऊ रोठे, गोरख आरखडे, नानासाहेब कुऱ्हे, सचिन आढाव, इंद्रभान कुऱ्हे, भाऊसाहेब गायकवाड, भीमराज आढाव, दिनकर उंडे, सचिन उंडे, जयराम कदम, बाळसाहेब रोठे, उज्जेभान उंडे, भारत कुऱ्हे, समाधान कदम, अशोक रोठे, सुनील रोठे, जगदीश उंडे, कचरू डुमरे, विलास आढाव आदी या बेमुदत उपोषणास बसले आहेत.