पायाभूत सुविधांमुळे नाशिक विकासाच्या निर्णायक वळणावर; विकासाचा मार्ग मोकळा

नाशिक : मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात कायम दुर्लक्षित राहिलेली नाशिकची बाजू विविध विकासकामांमुळे आता उजेडात आली असून, केंद्रासह राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतून नाशिक विकासाच्या निर्णायक वळणार आले आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार कोटींची घोषणा केल्यानंतर आता राज्य सरकारने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भरीव तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कोरोनामुळे २०२१-२२ हे वर्षे प्रत्येकाच्या लक्षात राहील. त्याप्रमाणे विकासाच्या दृष्टीनेही हे वर्ष नाशिककरांच्या कायम लक्षात राहणार आहे. कारण स्पर्धात्मक दृष्टिकोनातून का होईना नाशिकच्या पदरी पायाभूत सुविधांचे भरभरून दान पडत आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले. ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग नाशिकमधून जात असून, त्यावर घोटी व वावी येथे इंटरचेंज देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर असो की मुंबई, ही दोन्ही शहरे नाशिकपासून जवळ आली. या मार्गावर ७.१ किलोमीटरचा बोगदा तयार करण्याचे काम सुरू असून, राज्यातील माहामार्गावरील हा सर्वांत मोठा बोगदा ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाची वाट नाशिककर पाहत असतानाच केंद्र सरकारने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग १२२ किलोमीटर अंतर नाशिकमधून पार करणार आहे. त्यामुळे सुरत शहर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने नाशिक शहरात टायरबेस मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केल्याने सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. उडान योजनेंतर्गत नाशिकमधून अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बेंगळूरू, दिल्ली, बेळगाव या महत्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आयटी उद्योगांना चालना मिळेल. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पाइपलाइनद्वारे पोचविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. 
 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

नाशिक-पुणे महामार्गामुळे विकास 

अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग व्हावा, अशी उद्योजकांची इच्छा होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प पुढे ढकलला गेला. सध्या प्रकल्पाची किंमत १६ हजार कोटींवर पोचलेली असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय घेतला. नाशिक-पुणे २३५ किलोमीटर अंतर हे अवघ्या दोन तासांत कापता येणार आहे. 
 
औद्योगिक, कृषी व पर्यटनाला चालना 

नाशिक-पुणे मार्गावर नाशिकमधील सातपूर, अंबडसह सिन्नर, संगमनेर, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळे फाटा या प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. रेल्वेमार्गामुळे येथील विकासाला अधिक चालना मिळेल. त्याचबरोबर कृषी उत्पादनांमध्येही हा भाग आघाडीवर असल्याने शेतमालासह नाशवंत व कृषी उत्पादने वेगाने प्रमुख शहरांमध्ये पोचणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील देवस्थाने, पर्यटनस्थळांकडे पोचण्यासाठी रेल्वेमार्गाने कल्याण जावे लागते. आता हा अतिरिक्त फेरफटका वाचणार आहे. 
 
या गावांचा विकास 

नाशिक तालुक्यातील एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी, नायगाव, देशवंडी, पाटपिंपरी, बारागावपिंप्री, गुळवंच. निफाड तालुक्यातील पिंपळगाव-निपाणी या गावांमधून रेल्वेमार्ग जाणार आहे. त्यामुळे या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

नाशिक-पुणे लोहमार्गात महत्त्वाचे 

* १६ हजार कोटींचा प्रकल्प 
* पीपीपी तत्त्वावर साकारणार 
* रेल्वे विभागाची यापूर्वीच मंजुरी 
* लोहमार्गाची लांबी २३५ किलोमीटर 
* लोहमार्गावर २४ स्थानके. यात १६ छोटी, आठ मोठी स्थानके 
* पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांतून मार्ग जाणार 
* अठरा बोगदे, लोहमार्ग पूर्ण झाल्यास दिवसातून ४८ फेऱ्या