पालकमंत्री दादा भुसे : ‘तो’ विरोध राजकीय द्वेषाने प्रेरितच

दादा भुसे www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
बोरी अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्पामुळे गळती रोखून शेवटच्या गावापर्यंत सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार आहे. पूरपाण्याने तलाव, बंधारे, शेततळे पाण्याने भरून देता येतील. हजारो शेतकर्‍यांना 4 ते 6 महिने पाणी मिळेल. तरी केवळ राजकीय द्वेषापोटी, शेतकर्‍यांची, मजुरांची पर्यायाने माळमाथ्याची प्रगती होऊ नये, म्हणून काही विरोधकांनी अफवा पसरवून प्रकल्पाला विरोध केला आहे, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगिलते.

येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात शहर व तालुका पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात त्यांनी, बोरी अंबेदरी प्रकल्पावरुन सुरू असलेले आंदोलन राजकीय भावनेने प्रेरित असल्याची टीका केली. बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश कचवे यांनी सहभागी होत प्रकल्पाचे महत्त्व सांगत अप्रत्यक्षपणे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची भूमिका मांडली. तत्पूर्वी, दि. 23 ते 29 डिसेंबर दरम्यान, पोलिस कवायत मैदानावर होणार्‍या शिव महापुराण कथा कार्यक्रमावर चर्चा झाली. आयोजन समितीचे पदाधिकारी पिंटू कर्नावट यांनी माहिती दिली. कार्यक्रमास बहुसंख्येने भाविक सहभागी होणार असल्याने शेकडो शिवसैनिक सेवा देतील, सर्व नियोजन शिस्तीने करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. नुकत्याच नियुक्त्या झालेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सौंदाणे व करंजगव्हाण ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचाही गौरव झाला. ना. भुसे यांनी ग्रामपंचायत उमेदवारांना मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्हाप्रमुख संजय दुसाने, भरत पवार, संजय कदम, प्रदीप देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

आज आंदोलन
मंजुरीप्रमाणे बोरी अंबेदरी कालवा बंदिस्त करावा, हे काम विनाविलंब सुरु करावे, या मागणीसाठी सोमवारी (दि.12) झोडगे परिसरातील ग्रामस्थ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा:

The post पालकमंत्री दादा भुसे : 'तो' विरोध राजकीय द्वेषाने प्रेरितच appeared first on पुढारी.