पालकमंत्री दादा भुसे : समान विकास हेच सूत्र

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव ) : पुढारी वृत्तसेवा
शहराच्या पूर्व व पश्चिम भागाच्या विकासासाठी समान निधी वाटपाचे धोरण असेल. त्यात दुजाभाव टाळला जाईल. आता होऊ घातलेल्या 100 कोटींच्या कामांमध्येही सरासरी हेच सूत्र पाळल्याचे स्पष्टीकरण देत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी अजिज कल्लू स्टेडियमच्या विकासासाठी येत्या 10 दिवसांत दोन कोटींचा निधी मिळेल, अशी घोषणा केली.

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर 100 कोटींच्या अनुदानातून शहरात होणार्‍या 19 पैकी चार रस्त्यांच्या भूमिपूजनानंतर हबीब हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावच्या दौर्‍यात दिलेल्या 100 कोटींच्या निधीच्या आश्वासनाची पूर्ती केली. त्यात 30 टक्के मनपा व राज्य शासनाचा 70 टक्के असेल, तरी येत्या काळात मनपाचा हिस्साही शासनाने द्यावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. हे काँक्रीट रस्ते किमान 25 वर्षे टिकतील, अशा दर्जाचे होतील. त्याप्रमाणे काम होत नसल्याचे निदर्शनास आल्यास ठेकेदार, जबाबदार अधिकार्‍याला सांगा, त्याकडे दुर्लक्ष झाल्यास थेट आमदार मुफ्ती किंवा माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन करताना, ठेकेदाराला चांगले काम करता यावे यासाठी सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले. या कामांबाबत पूर्व-पश्चिम असा वाद निर्माण केला जात असल्याचा संदर्भ देत पालकमंत्र्यांनी, निधी 100 कोटींचा असला तरी जीएसटी, रॉयल्टी आदी वजा जाता 89 कोटी प्रत्यक्ष खर्च होतील. त्यापैकी 43.23 कोटींची 12 कामे ही ‘मालेगाव बाह्य’त, तर 11.92 कोटींची सहा कामे ‘मालेगाव मध्य’त आणि विशेष म्हणजे 31.82 कोटींची चार कामे ही मध्य-बाह्यला जोडणारी असल्याचे नमूद केले. जनरल चार कामांसाठी 31.82 कोटी रुपये निधी दिला आहे. असे असताना हेतूपुरस्सरपणे दिशाभूल केली जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरी भविष्यात पोलिस कवायत मैदानावरील जॉगिंग ट्रॅकप्रमाणेच हा अपप्रचारही निरर्थक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार मौलाना मुफ्ती यांनी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील स्थितीत विरोधाभास असल्याकडे लक्ष वेधत शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधीची मागणी केली. व्यसनाधीन तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी कल्लू स्टेडियमच्या विकासासाठी निधी द्यावा. शहरात राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू असून, त्यांना प्रोत्साहन दिल्यास शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा मुद्दा त्यांनी मांडला.

.. तर ठेकेदारावर फौजदारी कारवाई
सन 2017 मध्ये नवीन बसस्थानकासमोर उड्डाणपूल उभारण्यासाठी 21.27 कोटींचा निधी मंजूर झाला. 2019 मध्येच काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तो आज अपूर्णावस्थेत असल्याने त्यास ऐतिहासिक काम संबोधत पालकमंत्री भुसे यांनी, विविध अडचणींमुळे हे काम रेंगाळले असले तरी आता पाच कोटी अधिक निधी दिला जात आहे. त्यातून 4 ते 5 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असेल. ते न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, शिवाय ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा यावेळी दिला. दरम्यान, अमृत योजनेच्या दुसर्‍या टप्प्यालाही मंजुरी मिळाली आहे. 550 कोटी रुपयांच्या निधीतून भुयारी गटारसह इतर विकासकामे होतील. तत्पूर्वी होत असलेल्या सिमेंट रस्त्यांमध्ये भूमिगत गटारीसाठी, केबल, जलवाहिनी आदींसाठी जागा ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post पालकमंत्री दादा भुसे : समान विकास हेच सूत्र appeared first on पुढारी.