पालकांनो मुलांना सांभाळा! कोरोनात हृदय, मेंदूवर आघात; बालरोगतज्ञ सांगतात….

नाशिक : गेल्या वर्षाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने बालकांना कोरोना संसर्गाचा फारसा धोका नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये २० टक्के लहान मुले असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे नवजात बाळ आणि बारा वर्षाखालील मुले यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी नेमकी कशी घ्यावी, काय करावे आणि काय करु नये याची माहिती बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद भराडिया यांनी दिली. 

आरोग्य विभागाची माहिती; हृदय, मेंदूवर आघात

कोरोना आजाराचा ट्रेंड तपासताना आरोग्य विभागाला लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दर दहा रुग्णांमागे दोन ते तीन मुले कोरोना संसर्गित आढळून येत आहेत. लहान मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गात हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. लहान मुलांमध्ये शरीराच्या आकाराच्या मानाने विषाणूंचा भार जास्त होऊ शकतो. २७ मार्च २०२१ ला शहरात सर्वाधिक दोन हजार १८१ नवे बाधित आढळून आले. महिनाभरात सुमारे ३० हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत.

लक्षणे आढळल्यास मुलांची त्वरित चाचणी करा
वास घेण्याची क्षमता कमी होते, चव लागत नाही, झपाट्याने तब्येत खालावते, निस्तेज वाटणे, झोपेत राहणे, मेंदूशी निगडित आजार ही संभवणे, सर्वात जास्त खोकला असणे, चालायला त्रास होणे, बोलायला त्रास होणे, ऑक्सीजन पातळी कमी होणे ही सर्व संभाव्य लक्षणे असू शकतात असे ही डॉ. भराडिया यांनी सांगितले आहे . त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास मुलांची त्वरित चाचणी करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

हे उपाय करा 
-प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मुख्यतः हात स्वच्छ धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे महत्त्वाचे आहे. 
-साबणाच्या पाण्याने दर दोन-तीन तासांनी वीस सेकंद हात शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ धुवावेत, 
-नखे, बोटांमधील जागा, तळवे आणि मनगटही घासून स्वच्छ करावीत. 
-वारंवार नाक तोंडाला स्पर्श करू नये, 
-खोकताना थुंकीचे शिंतोडे वातावरणात पसरणार नाहीत, 
-यासाठी स्वत:चा रुमाल वापरणे आवश्यक आहे.
-टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. 

दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात
आजारी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची भीती अधिक असल्याचे सांगितले जात असले, तरी कोरोनाची काळजी न घेतल्याने तरुणांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब सप्टेंबर महिन्यातील एका अहवालातून स्पष्ट झाली होती. मे ते जून महिन्यात ६० पेक्षा अधिक वयोगटात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर मात्र तरुणांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक होते. एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मेपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र दर दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने विक्रम मोडीत काढले. बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५.४७ टक्के, तर महिलांचे प्रमाण ४४.५३ टक्के आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बचाव झाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील कोरोना लाटेने लहान मुलांनाही घेरले आहे.

कोरोनाबाधित मुलांना होऊ शकतो 'कावासाकी'
कोरोना बाधित असणाऱ्या लहान मुलांमध्ये 'कावासाकी' आजाराची लक्षणे सुद्धा आढळून येत आहेत. कावासाकी आजारामध्ये खूप ताप येतो. अंग अक्षरश: गरम पडतं. डोळे लाल होतात आणि मुलाच्या गळ्या भोवती गाठ निर्माण होते. लहान मुलांचे ओठ, जीभ आणि हात कोरडे पडून लाल होतात आणि शरीरावर अनेक ठिकाणी रॅशेस निर्माण होतात. मुलाची पचन क्षमता कमजोर पडते. त्याचा रक्तदाब सुद्धा वेगाने कमी होऊ लागतो आणि ब्लड वेसेल्स मध्ये सुद्धा सूज निर्माण होते. लहान मुलांच्या हातावर आणि पायावर सूज निर्माण होते. यामुळे त्यांना हाताची मुठ आवळण्यास आणि चप्पल घालण्यास सुद्धा समस्या निर्माण होते.

नवजात बाळाची अशी घ्यावी काळजी 
-हॉस्पिटल मध्ये नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला पाहण्यासाठी गर्दी करू नये 
-नवजात बालकांना आई आणि ठराविक नात्याशिवाय कोणीही हात लावू नये 
-स्वच्छ हात घेऊन अथवा हाताला सॅनिटायझर वापरून बाळाला स्पर्श करावा. 
-बाळाला आईचेच दूध पाजावे म्हणजे आपसूकच विषाणूपासून संरक्षण होईल. 
-बाळाला दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावे 
-शाळकरी वयाच्या मुलांना हात स्वच्छ ठेवण्याची सक्ती करावी. 
-खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भरपूर पाणी प्यावे.
-पोष्टीक सकस आणि नैसर्गिक आहार घ्यावा. जंकफूड अपायकारक ठरू शकतो 
-सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीपासून एक ते दीड मीटर अंतर अंतरावरुनच बोलावे. 
-स्पर्ष टाळावा तसेच बाहेरून मागवले जाणारे अन्नपदार्थ खाणे बंद करावेत.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

कोरोना पॉझिटिव्ह मुल निगेटिव्ह आल्यानंतरही किमान १ महिना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण लहान मुलांमध्ये एक महिन्यांनंतर धोका असण्याची शक्यता असते. जर काळजी घेतली नाही तर त्यावेळी मुलांना 'कावासाकी'  इम्युनिटी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. जर तुमच्या घरात कोणी कोरोनाबाधित व्यक्ती असतील तर तातडीने मुलांची टेस्ट करून घ्यावी. तसेच या सर्व गोष्टी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. - डॉ. मिलिंद भराडिया, बालरोगतज्ञ