पालकांमध्ये कोरोनाची भीती कायम! शाळांमध्ये अवघी १५ ते २० टक्के हजेरी 

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असताना बुधवार (ता. २७)पासून सुरू झालेल्या पाचवी ते आठवीच्या वर्गांना अवघ्या १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ऑनलाइन वर्गाचा पर्याय उपलब्ध असल्याने लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका नको म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. 

पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नकार

डिसेंबर महिन्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल ही भीती फोल ठरल्यानंतर बुधवार (ता. २७)पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शहरात एक लाख दहा हजार ७७३ विद्यार्थी, दोन हजार ६०२ शिक्षकांना परवानगी देण्यात आली. सुमारे दोन हजार ३०० शिक्षक, क्लार्क व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पाल्यांना शाळेत येण्यासाठी एकदाच संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले होते. बहुतांश शाळांनी ऑनलाइन संमतीपत्रे मागवून घेतली. पाल्य शाळेत येईल किंवा नाही या संदर्भात माहिती मागविण्यात आली होती. पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नकार दिला, तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परवानगीस होकार देण्यात आला. महापालिकेच्या १०२ शाळा व उर्वरित २०६ खासगी शाळांची बुधवारी घंटा खणाणली. त्या वेळी विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती आढळली. अधिकाधिक २० टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहिले, तर बहुतांश शाळांमध्ये उपस्थितीची टक्केवारी दहाच्या आत राहिली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

मास्क, सॅनिटायझर बंधनकारक 

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना मास्क बंधनकारक केले होते. शाळाखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शाळांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. खासगी शाळांमध्ये गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठीच शाळा सुरू राहणार आहेत. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

महापालिका व खासगी शाळांकडून मागविण्यात आलेल्या उपस्थिती अहवालातून अत्यल्प हजेरी असल्याचे आढळून आले आहे. पालकांमध्ये कोरोनाविषयक भीती असल्याचे यावरून स्पष्ट होते. पहिलाच दिवस असल्याने अनुपस्थिती असू शकते. येत्या काळात वाढेल. 
-सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी