नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. त्यामुळे पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी निश्चित रहावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
शाळा बंद का ठेवाव्यात असाही प्रश्न
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करायचा की नाही याबाबत विविध प्रकारचे मतमतांतरे माझ्यापर्यंत येत आहेत. काही पालकांच्या मते शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती आहे. तर काही पालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पाल्याची चिंता सतावत आहे. एकीकडे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती आहे. दुसरीकडे या महामारीची लागण झाल्यास संघर्ष कसा करावा हा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. राज्य शासन हळूहळू सर्व क्षेत्र अनलॉक करत असून शाळा बंद का ठेवाव्यात असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अंतिम निर्णय घेतला जाईल
सर्व प्रकारचे सुरक्षिततेचे उपाय योजून शाळा सुरू करता येईल, असा एक मतप्रवाह आहे. मात्र या सर्वात केंद्रस्थानी पालकवर्ग असून त्यांचा मतप्रवाह महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय जाहीर करण्यापेक्षा उद्या होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी काही महत्त्वाचे मुख्याध्यापक व पालक संघटना यांची बैठक घेऊन शाळा सुरू करायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?
प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करणार
सर्वच ठिकाणी शाळा बंद ठेवणेदेखील अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता तुरळक असलेल्या भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करता येतील का याबाबत मतमतांतरे जाणून घेतली जातील. सर्व पालक तसेच शिक्षक वर्ग किंबहुना विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे. त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या