पालिका प्रशासनाचा कारवाईचा दांडपट्टा; दोन महिन्यांत दीड हजारांहून अधिक केसेस 

नाशिक : कोरोना संसर्गाला अटकाव करायचा असेल, तर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क हाच एकमेव उपाय असल्याचे वारंवार सूचना देऊनही गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ॲक्शन मोडमध्ये येत गेल्या दोन महिन्यांत दीड हजारांहून अधिक केसेस नोंदविल्या आहेत. त्यातून सोळा लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ११६ केसेस करताना दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांच्याकडून समाजप्रबोधन करण्यात आले. 

गेल्या वर्षी शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबरोबरच मास्क परिधान न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एप्रिल व मे महिन्यांत एकही कारवाई झाली नाही. जूनपासून कारवाईला सुरवात झाली. ऑगस्टपासून कारवाईची व्याप्ती वाढविण्यात आली. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात मास्क परिधान न करणाऱ्यांवर कारवाई झाली. सहा विभागांत त्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत गर्दीमुळे कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्याने कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. ऑक्टोबर व फेब्रुवारी महिन्यांत सर्वाधिक केसेस करण्यात आल्या. सिडको, सातपूर व पंचवटी विभागात सर्वाधिक केसेस करण्यात आल्या. आयुक्त कैलास जाधव यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नातून मास्क परिधान करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

महिनानिहाय दंडवसुली 

महिना केसेस दंडवसुली (रुपये) 
जून १५२ ३० हजार ४०० 
जुलै ४५० ९० हजार 
ऑगस्ट २७ पाच हजार ६०० 
सप्टेंबर २२१ ४४ हजार २०० 
ऑक्टोबर दोन हजार ६५ चार लाख १३ हजार 
नोव्हेंबर ३४० ६८ हजार 
डिसेंबर ४२७ ८५ हजार ४०० 
जानेवारी २२६ ४५ हजार २०० 
फेब्रुवारी एक हजार २५६ सात लाख १६ हजार ६०० 
मार्च २५४ एक लाख ७८ हजार ८०० 
-------------------------------------------- 
एकूण ५,४१८ १६,७७,२०० 
-------------------------------------------- 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई 
महिना केसेस दंडवसुली (रुपये) 
जून सात सात हजार 
जुलै ११ ११ हजार 
ऑगस्ट ०० ०० 
सप्टेंबर तीन तीन हजार 
ऑक्टोबर १७ १७ हजार 
नोव्हेंबर आठ आठ हजार 
डिसेंबर २८ २३ हजार ८०० 
जानेवारी २५ २३ हजार ६५० 
फेब्रुवारी १४ १२ हजार ४०० 
मार्च तीन तीन हजार 
-------------------------------------------- 
एकूण ११६ १,०८,८५० 
--------------------------------------------