पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

इगतपुरी नाशिक,www.pudhari,news

 वाल्मीक गवांदे

इगतपुरी जि. नाशिक प्रतिनिधी

इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वांधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणुनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ उधळण करताना दिसते. पावसाळ्यात व थंडीत या भागात धुक्याची दुलई, डोंगरांवर पसरलेल्या धबधब्यांच्या रांगा, गडकोटांनी बहरलेला हा परिसर प्रत्येकाला मोहात पाडतो. (Nashik Igatpuri)

त्याच प्रमाणे इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर…निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण…घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते निर्मित धबधबे…खोल खोल दऱ्या…हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद मंद सुगंध…शेकडो पर्यटकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा भावली धरण परिसर. सगळे काही निसर्गरम्यच..(Nashik Igatpuri)

इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजल्या जाणा-या भावली धरण परिसरात पावसाच्या चार महीने येथे पर्यटक मोठया प्रमाणात आनंद घेण्यासाठी गर्दी करतात.  इगतपुरी तालुक्यात लहान मोठी अशी एकुण ७ धरणे आहेत. येथे पावसाळ्यात चार महीने सतत पाऊस पडत असतो. साधारणता या चार महिन्यात चार हजार ते साडेचार हजार मिलिमीटर पावसाची नोंद येथे होते. सतत पडणाऱ्या या पावसामुळे सर्वत्र ” हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे” या मखमालीवरती फुलराणीही खेळत होती” या कवितेला समर्पक असे वातावरण इगतपुरी तालुक्यात सध्या पहावयास मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखंडपणे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्के व वेगाने वाहणारे वारे, पावसामुळे संपूर्ण तालुक्यात हिरवागार गालीचा, हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाच्या ढगाच्या दुलईत शिरलेली शिखरे व कडेकपारीतून वाहत येणाऱ्या निर्झराचे उंचावरून पडणारे धबधबे, असे मनमोहक चित्र सध्या इगतपुरी तालुक्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. या निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी इगतपुरी शहरातील नगरपरिषद तलावा जवळील गोल टेकडी येथील मनमोहक धबधबा, भावली धरण व येथील धबधबे, वैतरणा धरण, त्रिंगलवाडी किल्ला, कसारा घाटासह, उंटदरी, घाटनदेवी मंदिर, खोडाळा रस्ता व घोटी सिन्नर भंडारदरा रस्त्यावर पर्यटकांची एकच गर्दी होत आहे.

कसारा घाटातील रेल्वे ( छाया : वाल्मिक गवांदे)

नाशिक मुंबई पासून किती अंतर ?

निसर्गाची अनुभूती अनुभवण्यास आलेला प्रत्येक पर्यटक तालुक्यातील निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून भारावुन जात आहे. इगतपुरी येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या पिंप्रीसदो फाट्यापासुन भावली धरण परीसरातील धबधबे पाहण्यासाठी ७ कीमी अंतर आहे. नाशिक येथुन भावली धरण ५० कीमी. च्या अंतरावर आहे. तर मुंबई येथुन १३० कीमी. अंतरावर आहे. तसेच कसारा घाटातील जव्हार मार्गावर अशोका धबधबाही पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत आहे. भावली धरण परीसर व मुंबई आग्रा महामार्गावर राहण्यासाठी व्हेज, नॉनव्हेजसाठी पंचतारांकीत अनेक हॉटेल्स आहेत. भावली धरणाप्रमाणेच वैतरणा धरण, भंडारदरा धरण, वाकी खापरी धरण, अशोका फॉल्स, मुकणे धरण, रंधा फॉल्स, कळसुबाई शिखर आदी सर्व पर्यटन स्थळे इगतपुरी पासुन १५ ते २० की. मी. च्या अंतरावर आहे. इगतपुरीला रेल्वे स्थानक असुन मुंबईहुन दिल्ली, कोलकाता, नागपुर, वाराणसी, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी ठीकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व मेल, एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा आहे. कसारा ते इगतपुरी असा १७ की. मी. चा घाट आहे.

पावसाळ्यात चार महिने धमाल…

पावसाळ्यात कसारा घाटातही अनेक ठीकाणी पावसाळ्यात धबधबे तयार होत असतात. तसेच कसारा घाटातील रेल्वे मार्गावरील ब्रिज व बोगदे व तेथे तयार झालेले धबधबे व निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. पावसाळ्यात चार महीने येथे शनिवार व रविवार सुट्टी असल्याने मुंबई, नाशिक येथुन हजारो पर्यटक इगतपुरीत दाखल होतात. या ठीकाणी हजारो पर्यटकांनी हजरी लावत धबधब्याखाली बसुन मनमुराद आंघोळीचा आनंद लुटत असतात. तालुक्यातील कावनई येथे कपिलधारा तीर्थक्षेत्र असुन शिवशंकर, पार्वती, कपिलमुनी, श्रीराम, हनुमान, शुक्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान म्हणुन प्रसिध्द आहे.

घोटीपासून कावनई मार्गावर चार किलोमीटर अंतरावर बिटूर्ली शिवारातील पंपासरोवर येथे संत श्री. गजानन महाराजाची तपोभूमी आहे. याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी १२ वर्षे तपश्चर्या केली होती. इगतपुरी पासुन ४० की. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे धार्मिक ठिकाण आहे. येथेही मोठ्या प्रमाणात धबधबे पाहण्यासारखे आहेत. तसेच येथे निवृत्ती नाथांची समाधी असुन १२ ज्योतीर्लिंगा पैकी महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. याच परीसरात रामभक्त हनुमानाचे अंजनेरी म्हणुन जन्मस्थळ आहे. या परीसरातही अनेक पंचतारांकीत हॉटेल्स आहेत.

भावली धबधबा इगतपुरी
भावली धबधबा इगतपुरी

The post पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी appeared first on पुढारी.