पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे… पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेगार झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळखळून वाहात असतात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टिकोनातून वाईटदेखील असतो.
गेल्या दोन वर्षांत असुरक्षित ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. धाडस आणि अनावश्यक धोका वाढल्याचा प्रकार अनेकदा बघावयास मिळतो. पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास किंवा परिसराबाबतचे भौगोलिक अज्ञान या गोष्टींमुळे होतात. कोणतेही नियोजन न करता विद्यार्थी, पालक वर्षासहलीला जातात आणि अपघात घडतात. यासाठी सुरक्षित पर्यटन करायला हवे.
ट्रेकिंग एक साहसी खेळच म्हणावा लागेल आणि खेळाचा अभ्यास, सराव केल्याशिवाय मैदानात उतरायचे नसते, याचे भान भटकंती करताना राहात नाही. ट्रेकिंगला जाताना पाऊस, दाट धुके, उंच डोंगर, खोल दऱ्या, निसरड्या वाटा आणि चिखल यांचा विचार केला जात नाही. कौटुंबिक सहलीसाठी आपण आपल्या परिवाराबरोबर अशा ठिकाणी वरील गोष्टी विचारात न घेता जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच. सध्या गिर्यारोहकांचे ग्रुप मोठमोठी जाहिरात करून ट्रेकिंग शिबिरे घेतात पण यातील किती ग्रुप अधिकृत आहेत, याचा विचारही पालक करीत नाहीत. भटकंती करताना आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेऊन व ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करूनच जायला हवे.
निसर्ग अधिवास जपा
ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे व साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी व पक्षी विचलित होण्याची शक्यता असते. ट्रेकदरम्यान पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा बरोबर बाळगणे आवश्यक आहे. पाणी जास्त असेल, तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले, तरी निसर्गसंवर्धनाचे कामदेखील होईल. ट्रेक करताना प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासातून जावे लागते. आपला वावर त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी.
ट्रेकिंगला सोबत असाव्यात अशा वस्तू
पावसापासून संरक्षण होईल असे कपडे, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, औषधे, स्विस नाइफ, काडेपेटी किंवा लाइटर, प्लास्टिक पिशव्या, जुनी वर्तमानपत्रे, छोटी शिटी, ओळखपत्र, चांगली बॅटरी व सेल, नायलॉन दोरी, दिशादर्षक.
भटकंती करताना हे करू नका
निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये, ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखावे, कोणतेही व्यसन करू नये, धोक्याच्या जागी सेल्फी घेणे टाळावे, वन्य प्राण्यांना खाद्य पदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे, जंगलात फळे, फुले तोडू नये आणि कंददेखील घरी आणू नये.
हेही वाचा: