पिंगळे-चुंभळेंची गळाभेट! वादावर पडदा पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सिडको (नाशिक) : सिडको परिसरात बुधवारी (ता. ३१) दिवसभर अनेक राजकीय उलथापालथ करणाऱ्या घडामोडी घडल्या. आमदार सीमा हिरे यांनी माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत यापुढे कोणतीही निवडणूक एकोप्याने लढविण्याचा आणि एकमेकांना कायम साथ देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व घटकांना एकत्र घेऊन संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरण्याच्या आणाभाकाही या वेळी घेण्यात आल्या. आपण दोघेही हिरे मग आपापसांत भांडण का करायचे, याचे आत्मपरीक्षण करूया, असेही या वेळी दोघांमध्ये ठरले. या नेत्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे समर्थक मात्र चांगलेच सुखावले आहेत. तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले. दरम्यान, चुंभळे आणि पिंगळे यांच्या गळाभेटीचे छायाचित्र मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते मिळून आले नाही. 

 भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर शाखाप्रमुखाच्या बैठकीत व्यस्त आहेत. आगामी निवडणुकीत भाजपशी पंगा न घेता मित्रत्वाच्या नात्याने निवडणुका लढविल्या जातील. भाजपाविरुद्ध कोणताही अपप्रचार शिवसैनिक करणार नाहीत, आपण दोघे भाऊ- भाऊ निवडणुकांतील जागा वाटून घेऊ. एकमेकांवरील टीकाटिप्पणी विसरून जाऊ, असा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

निवासस्थानी जाऊन सत्कार

स्थायी समितीचे माजी सभापती तसेच नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यापुढे नाशिक बाजार समितीच्या कोणत्याही व्यवहारात आणि कामकाजात लुडबूड न करण्याचा तसेच सभापती देवीदास पिंगळे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले आहे. बाजार समितीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समितीचे नाव सातासमुद्रापलीकडे जावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे श्री. चुंभळे यांनी सांगितल्याने सर्व संचालकांनी चुंभळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पिंगळे यांनी चुंभळे यांची गळाभेट घेत जन्मोजन्मी तुमच्यासारखा मित्र मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. करण गायकर यांनी यापुढे केवळ मराठा समाजाचाच विचार न करता धनगर, ओबीसी आणि इतर समाजालाही आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व समाजाचा एकोपा टिकून राहणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीनेच आपण हा निर्णय घेतल्याचे गायकर यांनी नमूद केले. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वास्तवाशी काहीही संबंध नसून, केवळ एप्रिल फूलचा सुखद धक्का देण्याचे उद्देशाने हे वृत्त देण्यात आले. तरी सुजाण वाचकांनी गैरसमज करून घेऊ नये,असा सूर सिडको परिसरात उमटल्याचे दिसून आले.