पिंपळगाव परिसरात ५० कोटींचे नुकसान! अवकाळी ठरला ‘दुष्काळात तेरावा महिना’ 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अवकाळी पावसाने द्राक्षनगरीची दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले असून,  पावसाच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आहे. अगोदर दराअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरला आहे. निफाड तालुक्यातील ५० लाख एकरांवरील द्राक्षबागांची तब्बल ५० कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

गुरुवारी (ता. १८) दुपारपासूनच आभाळात ढगांची गर्दी झाली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळगाव बसवंत, साकोरे (मिग), कोकणगाव, पालखेड, शिरवाडे वणी, आहेरगाव या द्राक्षबागांचे आगर असलेल्या परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. टपोऱ्या थेंबांसह धुवाधार पावसाने द्राक्षबागा झोडपल्या. तुफान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने ग्रेप्स इंडस्ट्री चांगलीच हादरली. द्राक्षघडांना तडे जाण्याबरोबर दर्जा घसरण्याची भीती आहे. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 
 

काढणीच्या द्राक्षाची नासाडी 

तीन वर्षांपासून विविध संकटांनी ग्रस्त शेतकऱ्यांनी लक्ष्मीधन विकून भांडवल उभे केले. निफाड तालुक्यात बहुतांश द्राक्षबागा परिपक्व झाल्या आहेत. मोठ्या अपेक्षेने व्यापाऱ्यांशी शेतकरी सौदे करीत आहेत. पण, आजचा पाऊस कर्दनकाळ ठरला. निफाड तालुक्यातील ५० लाख एकरांवरील द्राक्षबागांला अवकाळीने तडा दिला. द्राक्षमण्यांना तडे गेले असून, तासाभराच्या पावसाने स्वप्नावर पाणी फेरले आहे. तब्बल ५० कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निर्यातक्षम द्राक्षे स्थानिक बाजारपेठेतही विक्रीयोग्य राहिलेली नाहीत. द्राक्षबागेत घडांचा सडा पडल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश