Site icon

पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
रब्बी हंगामातील पीके काढण्यावर आली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतक-यांच्या तोंडाचा घास हिसकावला आहे. सोमवार, सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

सोमवार. दि. 6 सायंकाळी ४ च्या सुमारास विजांचा कडकडाटासह वादळीवारा सुरू झाला. साक्री तालुक्यातील दहिवेल, निजामपूर, जैताणे, टिटाणे भागात पावसाच्या एक तासाच्या हजेरीतच संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळनेरसह पश्चिम पट्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पहाटे तीन पासून पावसाचे वातावरण तयार होवून विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाट होवून पावसाचे आगमन झाले. कुडाशी, वासा, उमरपाटा, टेंभा परिससरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळे काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

तर पुन्हा सायंकाळी ४ च्या सुमारास साक्री तालुक्यातील मूळमाया परिसरातील निजामपूर जैताणे, खोरी टिटाणेसह परिसरात सर्वत्र बोरीच्या आकाराएवढ्या गारपीट झाली. त्यामुळे महामार्गावरील रहदारी काही वेळाकरिता थांबली. तर गहू, हरभरा, मका आदी पिके काढणीवर आलेली असताना अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास लहरी पावसाने हिसकावला आहे. काही ठिकाणी गहू काढणी सुरू झाली होती तर बहुतांश शेतकऱ्यांनी गुरांचा चारा शेतात ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे चारा वाहून नेतांना त्यांना मोठी कसरत झाली. कसे बसे शेतक-यांनी गुरांकरीता थोडा चारा वाचवला आहे.  नुकसान मोठे असल्याने महसुल विभागाने त्वरित पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान appeared first on पुढारी.

Exit mobile version