Site icon

पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यात पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागल्याने थंड पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. तसेच माठांच्या किंमती बाजारात तेजीत असल्याचे चित्र असले तरी माठाऐवजी गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो आहे.

साक्री तालुक्यासह पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यातील भागात वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला आहे. तसेच उष्माघाताचा त्रास जाणवत असल्याने गार पाणी पिण्याकडे कल वाढला आहे.  येथील भागात पारा ३८ ते ४० अंशांवर जात आहे. एकंदरीत वातावरणातील या बदलाने थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने पिंपळनेरच्या आठवडे बाजारात स्थानिक कारागिरांनी मातीचे माठ विक्रीस आणले आहेत. गेल्या वर्षी दीडशे ते दोनशे रुपये किंमत असलेल्या माठांना यंदा अडीचशे ते पाचशे रुपये किंमत झाली आहे. वाढती महागाई, मजुरी, वाहतूक यांच्या परिणामामुळे किमती वाढल्याचे व्यावसायिक सांगतात. तरी किंमत जास्त असली तरी फ्रिजमधील थंड पाण्यापेक्षा माठातील पाण्यालाच गोडी अधिक असल्याने गरिबांसह श्रीमंतही माठाची हौसेने खरेदी करताना दिसत आहेत. कारागिरांनीही माठामध्ये कालानुरूप थोडासा बदल करून या माठांना तोट्या बसून त्याची विक्री सुरू केली आहे. सध्याच्या काळात थंडगार बाटलीबंद पाणी सर्वत्र उपलब्ध होत असले तरी थंड पाण्याचे जार घरोघरी जाऊ लागले आहेत. यासह लहान मोठे व्यावसायिक, बॅंका, निमशासकीय कार्यालये, सेवा सोसायटी, हॉस्पिटल अशा ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवले जात आहेत. परिसरातील हटिलांमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी थंड जारचे पाणी उपलब्ध करण्याची स्पर्धा लागलेली आहे. याचा परिणाम माठ विक्रीवर होत असल्याचे माठ विक्रेते सांगत आहेत.

पिंपळनेर: माठ बनवितांना त्यावर हात फिरवताना कुंभार.

रांजण उरले पाणपोई पुरते
थंडगार असे पाण्याने भरलेले जार प्रत्येक व्यावसायिक हॉटेलसमोर ठेवलेले दिसत आहेत. त्याकडे नजर जाताच ग्राहकराजाही त्याच हॉटेलकडे जातांना दिसत आहे. त्यामुळे पूर्वीचे मोठमोठे रांजण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी दारोदारी असणारे मोठे रांजण केवळ आता पाणपोईसाठीच वापरले जात आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम appeared first on पुढारी.

Exit mobile version