पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेरwww.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी बरी असली तरी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाटीपाडा धरण तसेच परिसरातील नदी नाले एमआय टॅन्क दोन ते तीन महिने ओसंडून वाहत होते. पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने पाणीटंचाई ही संपुष्टात आली होती. पिंपळनेर लाटीपाडा धरण, जामखेली तसेच शेलबारी व वीरखेल एमआय टॅन्क पूर्ण क्षमतेने भरून गेली होती. त्यामुळे येथील धरणावर अवलंबून असलेली गावे, शेती यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला होता. मात्र मागील महिन्यापासून येथील तापमानात वाढ होत असल्याने लाटीपाडा धरणातून रब्बीसाठी पाणी देऊन देखील लाटीपाडा धरणात ३६५ एमसीएफटी म्हणजे २९ टक्केच जलसाठा सध्या मे महिन्यात शिल्लक आह. तसेच जामखेली धरणातील १३६ एमसीएफटी म्हणजे ३१ टक्के जलसाठा आहे. एमआय टॅन्क आरक्षित शेलबारी २ व वीरखेल १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात जून महिन्यात २० टक्के एवढाच जलसाठा लाटीपाडा धरणात शिल्लक होता. यंदा मात्र १७ मे रोजी लाटीपाडा धरणात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. लाटीपाडा धरणातील जलसाठा शिल्लक असल्याने नदी काठावरील गावांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. सध्या उष्णतेचा पारा वाढत असताना ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुरांनाही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठीच नदीकाठावरील गावांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. येथील पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.