पिंपळनेर : मधुमेहाच्या क्षेत्रात भारतीय संशोधकांना ऑस्ट्रेलियन पेटंट

भारतीय संशोधक www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

येथील भूमिपुत्र डॉ. प्रशांत बागुल, नाशिक जिल्ह्यातील करंजाळी येथील डॉ. प्रकाश वानखेडकर या संशोधकांनी सहकाऱ्यांच्या मदतीने “इन्सुलिन इंजेकटिंग डिवाईस” शोध घडवून आणला आहे. या शोधाला नुकतेच ऑस्ट्रेलियन पेटंट देखील मिळाले आहे. या उपकरणामुळे मधुमेही रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

भारत हा मधुमेह रुग्णसंख्येत बाबतीत जगात दुसरा असून सरासरी 7 करोड 70 लाख मधुमेही भारतात असून 1.2 करोड रुग्ण हे 65 वयोगटाच्या आतील असून पुढे हि संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूला मधुमेह हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारणीभूत ठरत आहे. यावर संशोधनाची गरज लक्षात घेता भारतीय संशोधकांनी  नवीन शोध घडवून आणला आहे. या शोधाला नुकतेच ऑस्ट्रेलियन पेटंट देखील मिळाले आहे. “इन्सुलिन इंजेकटिंग डिवाईस” असे या उपकरणाचे नाव असून हे उपकरण हाताच्या दंडावर किंवा मांडीवर लावता येण्यासारखे आहे. हे उपकरण ठरलेल्या वेळी स्वयंचलित किंवा त्या त्या वेळी दिलेल्या आदेशानुसार रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून इन्सुलिन किंवा ग्लुकोज डोस देणारे आहे. या उपकरणामुळे मधुमेही रुग्णांना वारंवार सुई टोचायची आवश्यकता किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे याचा त्रास होणार नाही. तसेच हे उपकरण लावून रुग्ण दैनंदिन कामे सुरळीतपणे करू शकणार आहे. या उपकरणाच्या संशोधनाचे काम डॉ. प्रकाश तानाजी वानखेडकर, करंजाळी (नाशिक), डॉ. प्रशांत कांतीलाल बागुल, पिंपळनेर (धुळे), डॉ. शेख हासीम मोहम्मद इसाक, कुसुंबा, (धुळे), डॉ. संगिता भीमराव डोंगरे, संभाजी नगर, डॉ. युसुफ इब्राहिम पटेल, जळगाव, यांनी केले असून या पुढील संशोधन सुरू आहे. या उपकरणामुळे मधुमेही रुग्णांना दिलासा मिळणार आहे. डॉ. प्रशांत बागुल हे पिंपळनेर येथील भूमिपुत्र असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : मधुमेहाच्या क्षेत्रात भारतीय संशोधकांना ऑस्ट्रेलियन पेटंट appeared first on पुढारी.