पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी; दोन ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी करणाऱ्या दोन ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 31 म्हशी, दोन ट्रकसह एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना संशयितांना ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर वार्सा रस्त्यावरून पिंपळनेर मार्गे मालेगावकडे दोन ट्रकमधून म्हशींची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गोरक्षक मयूर शंकरराव आडे कासार व दिलीप माळी यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पिंपळनेर पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांचे पथक नवापूर रस्त्याकडे रवाना करण्यात आले. पोलिसांनी मानव केंद्राजवळील मल्ल्याचा पाडा येथे सापळा रचला आणि वार्साकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या ट्रक (जीजे 15 एक्सएक्स 9957 व जीजे 5 एटी-5890) ही दोन वाहने पकडली. वाहन चालकांकडे विचारणा केली असता वाहनांमध्ये जाफरी जातीच्या व इतर जातीच्या म्हशी होत्या. या म्हशी मालेगावकडे नेत असल्याचे सांगितले. ट्रकमध्ये तपासणी केली असता, म्हशी निर्दयतेने दोरखंडाने दाटीवाटीने कोंबून बांधल्या असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दोन्ही ट्रकसह वाहनावरील चालक संशयित इसाक मोहम्मद चोरावाला (वय 44,रा.वलन जि.भरुच,बडोदा), अमीनखान अमु मोहम्मद (वय 38,रा.गोकुळ नगर, जि.भरूच), क्लिनर मीनहाज अहमद दिवाण (वय 30,रा. वलन,पंजाब नगर ता.करजन जि.बडोदा) व फारूक इब्राहिम गरासिया (वय 37, रा.बाबर कॉलनी, वलन ता.करजन जि.बडोदा) या गुजरातधील चौघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गोरक्षक मयूर शंकरराव कासार यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध प्राण्यांचा हक्क अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नाईक पी.एच.मालचे,कर्मचारी आर.पी.बोरसे,डी.पी.माळी यांच्यासह पथकाने केली आहे.

म्हशींची शिंगे कापून वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत 14 लाख रुपये किमतीच्या दोन ट्रक, 8 लाख रुपये किमतीच्या 31 म्हशी असा एकूण 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्याचप्रमाणे ट्रकमध्ये म्हशींचे कापलेले शिंगे भरलेल्या गोण्या मिळून आल्या.त्यामुळे या म्हशींची नेमकी वाहतूक करण्याचा उद्देश काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

The post पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी; दोन ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.