पिंप्रीसदो आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा प्रश्न अखेर मिटला; आमदार खोसकरांच्या पाठपुराव्याने ६० कोटी मंजूर 

इगतपुरी (जि.नाशिक) : तालुक्यातील पिंप्रीसदो येथील ४७ एकर जागेत राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार होती. मात्र, आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे या क्रीडा प्रबोधिनीचे घोंगडे भिजत पडले होते. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नातून इगतपुरीच्या क्रीडा प्रबोधिनीसाठी भरीव निधी आमदार हिरामण खोसकर यांनी मंजूर केला आहे. खोसकर यांनी क्रीडा प्रबोधिनीसाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

आदिवासी मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार...

क्रीडा प्रबोधिनीकरिता इगतपुरी तालुक्यात जलसंपदा विभागाची पिंप्रीसदो येथील जमीन आदिवासी विकास विभागास हस्तांतरित करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरू होते. आदिवासी युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा व काटकता असते. धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडाप्रकारांचे कौशल्य त्यांच्यात नैसर्गिकरीत्या असते. जंगलातील चित्याच्या गतीने धावणारे आदिवासी युवकांचे पाय, एकलव्याप्रमाणे अचूक नेम साधत आवाज टिपणारी तीक्ष्ण नजर आणि वेगवान पाण्याचा प्रवाह कापत पोहणाऱ्या आदिवासी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला. तर, इगतपुरी तालुक्यात कविता राऊतसारखे धावपटू घडतील हाच मुद्दा लक्षात घेता आमदार खोसकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांकडे पाठपुरवा करत क्रीडा प्रबोधिनीचा मार्ग मोकळा करून भरीव निधी प्राप्त केला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच क्रीडा प्रबोधिनी मंजूर होती. मात्र योग्यवेळी पाठपुरवा न झाल्यामुळे प्रश्न पडून होता. आमदार खोसकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरवा करून क्रीडा प्रबोधिनीसाठी निधी मंजूर करून घेतला. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड