पिके जळाल्यावर पाणी देणार का? शेतकऱ्यांकडून आर्त हाक

चिचोंडी (जि.नाशिक) : मार्च महिना लागला अन्‌ उन्हाची तीव्रता अचानक वाढली. आधीच कांद्याची लेट लागवड आणि वाढलेले ऊन यामुळे एक ते दीड महिन्याचा कांदा शेतात कोमेजू लागला. आता या कांद्याला पाटपाण्याची गरज असून, दुसरे रोटेशन कधी सोडणार, अशी हाक शेतकरी देत आहेत. दुसरे आवर्तन आमच्या शेतातील पिके जळाल्यावर सोडणार का, अशी आर्त हाक आता शेतकरी देत आहेत. 

शेतातील पिके उन्हामुळे कोमेजू लागली 
या वर्षी आधीच पोळ व रांगड्या कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी उशिराने रोपे टाकून निसर्गाच्या अवकृपेनंतरही ती कशीबशी वाचविली. अनेकांनी रोपे नसताना महागडी रोपे खरेदी करत उशिराने कांदालागवड करून घेतली. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत कांदालागवड सुरू होती. पाटाच्या पाण्याच्या भरवशावर लागवड केलेले कांदापीक पाटपाणी लेट होत असल्याने संकटात सापडले असून, शेतातील पिके दुपारच्या वेळी कोमेजू लागली आहेत. परिणामी, या पिकांना आता पाटपाण्याची नितांत गरज आहे. येत्या आठ दिवसांत रोटेशन आले तर कांदापीक वाचू शकेल, असा अंदाज येथील नरेंद्र मढवई यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

शेतकऱ्यांचे दुसऱ्या आवर्तनाकडे लक्ष;
दरम्यान, पहिले रोटेशन फेब्रुवारी महिन्यात आल्यानंतर दुसरे रोटेशन मार्चच्या १० तारखेपर्यंत यायला हवे होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेने हे रोटेशन अद्यापही सोडलेले नसल्याने आणखीन किती दिवसांनी रोटेशन येईल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

अंदाज घेऊन केलेली लागवड संकटात

उन्हाची तीव्रता वाढल्याने व परिणामी पिकांना पाणी दिल्यानंतर लवकर जमीन सुकत असल्याने पिकांची होरपळ होत आहे. पाटपाण्याच्या भरवशावर व अंदाज घेऊन केलेली लागवड संकटात आली आहे. महागडे बियाणे, खते, रोपे घेऊन केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, पालखेडचे शेतीसाठीचे आवर्तन १० मार्चला सोडले जाईल, अशी अपेक्षा होती, असे शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी म्हटले. मात्र, अद्याप रोटेशन न सोडल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ज्यांच्याकडे शेततळी आहेत त्यांना तळ्यांचा आधार आहे. मात्र, या वर्षी कांदालागवड लेट होऊनदेखील पाटपाण्याच्या भरवशावर लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. येवला तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत. 
 

 

पालखेडचे दुसरे आवर्तन १० मार्चला सुटणार होते. मात्र, पिंपळगावजवळ कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने १५ तारखेच्या आता कॅनॉल सुटेल. जवळपास ३० दिवसांचे हे रोटेशन असणार आहे. 
-संभाजी पाटील, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, येवला 

पालखेड कालव्याचे रोटेशन मार्चच्या सुरवातीला सुटणे गरजेचे असताना ते अद्याप सोडले नसल्याने या पाण्याच्या नियोजनावर केलेली पिके संकटात आली आहेत. शेतकऱ्यांना मागणी केल्याशिवाय काही मिळत नाही का, असे आता वाटू लागले आहे. 
-बाळासाहेब मढवई, कांदा उत्पादक, चिचोंडी