पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

शेतकरी कृषी विभागात ठिय्या www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा सन्मान निधी हा वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नाहीये वारंवार अर्ज करूनही त्यावर कोणता तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. ढगे तसेच जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत हे तातडीने कृषी विभागात दाखल झाले. त्यांच्याच मध्यस्थीने नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली.

तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. याप्रसंगी शेतकऱ्यांची बाजू कृषी विभागाकडे मांडली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भगाळे, युवा मोर्चा तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, सरचिटणीस योगेश पाटील, गिरीश वराडे, शेतकरी किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

25 मार्चपर्यंत अडचणी सोडविण्याचे लेखी पत्र

जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन पुकारले. त्यामुळे हादरलेल्या कृषी विभागाने येत्या 25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांना त्यासंदर्भात लेखी पत्र देखील दिले. दरम्यान, दिलेल्या मुदतीत पीएम किसानचा प्रश्न न सोडविल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

हेही वाचा :

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.