पीएम स्वनिधीत नाशिक देशात अव्वल! पायलट सिटीमध्ये समावेश 

नाशिक : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांची ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेंतर्गत सर्वाधिक कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यात नाशिक महापालिका देशातील १२५ शहरांमध्ये अव्वल ठरली आहे.

देशातील १२५ शहरांमध्ये अव्वल

२४ हजार ४५९ ऑनलाइन अर्जदारांपैकी नऊ हजार ५६८ प्रकरणे मंजूर करून सात हजार ७०१ पथविक्रेत्यांना महापालिकेने कर्जवाटप केले. 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केल्याने सर्वच व्यवहार बंद राहिले. लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम फेरीवाल्यांच्या व्यवसायावर झाला. फेरीवाल्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन केंद्र सरकारने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला १७ जून २०२० पासून बॅंकांमार्फत विनातारण दहा हजार रुपये, नियमित कर्ज परतफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान, डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक योजना जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर मुदतीच्या आत कर्ज परतफेड केल्यास दुप्पट म्हणजे २० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले

पायलट सिटीमध्ये नाशिकचा समावेश

केंद्र सरकाच्या योजनेला प्रतिसाद देत महापालिकेतर्फे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी १७ हजार ८४० फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले; परंतु १३७ टक्के म्हणजे २४ हजार ४५९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले. प्राप्त अर्जांपैकी १६ हजार १४१ अर्ज बॅंकांनी स्वीकारताना नऊ हजार ५६८ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यातही सात हजार ७०१ फेरीवाल्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. कर्जाची एकूण रक्कम ९.४९ कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेसाठी देशातील १२५ महापालिकांची निवड करण्यात आली होती. त्यात नाशिक शहर अव्वल ठरल्याने पायलट सिटीमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

पथविक्रेत्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारची योजना अमलात आणण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. योजलेल्या उपाययोजनांमुळे देशात नाशिक महापालिकेची कामगिरी उंचावली. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका