पीक कर्जाची प्रकरणे मार्गी लावा; कृषीमंत्र्यांचे जिल्हा बँकेस निर्देश 

नाशिक/मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेला वितरीत केलेल्या १२२ कोटीच्या अनुदानापैकी किमान १०० कोटीचे पिककर्ज आठवड्यात वितरीत करत जिल्हा बँकेत दाखल पिक कर्जाची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी शासकीय विश्रामगृहावर सोमवारी (ता.२३) झालेल्या सर्व बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. 

तालुक्यातील १३ हजार ८५८ शेतकऱ्यांचे १२२ कोटीचे कर्जमाफीचे अनुदान जिल्हा बँकेला वितरीत करण्यात आले. यानंतर केवळ ८ हजार ९२० शेतकऱ्यांना ४६ कोटी ४५ लाखाचे पिक कर्ज जिल्हा बँकेने वितरीत केले. ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे सांगत मंत्री भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. पिक कर्जापोटी किमान १०० कोटीची रक्कम वाटप करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. पिंगळे यांना दिले. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

फेऱ्या मारण्याची वेळ येता कामा नये

भुसे म्हणाले, की पंतप्रधान सर्व नागरिकांना बँकींग क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करित असतांना नवीन बँक खाते उघडण्याबाबत बँकांची उदासिनता दिसून येते. शेतकऱ्यांची फरपट, विनावाटप पडून असणारे शासकीय अनुदान, महिला शेतकऱ्यांसह बचत गटांना असहकार्य याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. ही असमाधानकारक बाब असून ती खपवून घेतली जाणार नाही. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करावी. त्यांना वारंवार बँकेत फेऱ्या मारण्याची वेळ येता कामा नये. दाखल प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत असे आदेशही त्यांनी दिले. कर्जमाफीसाठी तांत्रीक अडचणीमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असतील, अशा शेतकऱ्यांची तपशिलवार माहिती सर्व बँकांनी सादर करण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले. सर्व बँकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रातांधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

यासाठी बँकांनी आपसात समन्वय ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा उपनिबंधक सतिष खरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मालेगावचे विभागीय अधिकारी एम.टी.डंबाळे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.