पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी

देवळा,www.pudhari.news

देवळा(जि. नाशिक) : शासनाने देवळा तालुका दुष्काळी जाहीर केला असून पिक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत यामागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. १७ )रोजी शिवसेनेच्या (उबाठा गट) वतीने तालुका प्रमुख व मेशी येथील लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसिलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा की, संपूर्ण देवळा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. यामुळे राज्य शासनाने देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या ( उबाठा गट) वतीने गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार शासनाने देवळा तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहिर केला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री योजनेंतर्गत पिक विमा काढला आहे. त्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर अद्याप वर्ग झालेली नाही. सरकारने सदर रक्कम दिपावलीच्या आत वर्ग होईल असे आश्वासन दिले होते. विम्याची रक्कम वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही. इतकी भयावह परिस्थिती देवळा तालुक्यात निर्माण झालेली आहे. आधीच शेतकऱ्यांचे आस्मानी व सुलतानी संकटांनी कंबरडे मोडले आहे. त्यातच शासनाकडून एका प्रकारे सापत्न वागणूक दिली जात आहे

याची शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर त्वरीत वर्ग करावेत अन्यथा शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) वतीने कुठलीही पूर्व सुचना न देता आंदोलन केले जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील पवार, तालुका प्रमुख व मेशी येथील लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब जाधव, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, उप तालुका प्रमुख विलास शिंदे, संघटक विजय आहेर आदींसह खडूं जाधव, जितेंद्र भामरे, गोरख गांगुर्डे, ज्ञानेश्वर देवरे, नितीन शेवाळे, गोविंद सोनवणे, सतीश बोरसे, आबाजी बोरसे, देवा चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा :

The post पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी appeared first on पुढारी.