‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव! नाशिक आवृत्तीचा 8 वर्धापनदिन अपूर्व उत्साहात

दै. पुढारी वर्धापनदिन नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मंगलमय वातावरण अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत दै. पुढारीच्या नाशिक आवृत्तीचा आठवा वर्धापनदिन अपूर्व उत्साहात साजरा झाला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, साहित्यिक, चित्रपटसृष्टी व प्रशासनासह सर्वसामान्य नाशिककरांनी या स्नेहमेळाव्याला उपस्थिती दर्शवित ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल येथील कुसुमाग्रज स्मारक येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. पुढारीने वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या ‘युगांतर’ या विशेषांकाचे सर्वांनीच मन:पूर्वक कौतुक केले. विविध क्षेत्रांतील स्नेहीजनांच्या भेटीचा योग जुळवून आणणारा आपल्या हक्काचा सोहळा, या भावनेतून जिल्हाभरातून विविध मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शविली. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विशेष पोलिस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलिस आयुक्त बी. जी. शेखर, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, जिल्हा रुग्णालयाचे मुख्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, नितीनकुमार मुंडावरे, पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, तहसीलदार राजश्री अहिरराव, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, महापालिकेचे शहर अभियंता नितीन वंजारी, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, अभिनेता किरण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थित राहून ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात झालेल्या या गौरव सोहळ्याचा जोश व उल्हास अखेरपर्यंत वाढत गेला. अनेक मान्यवरांनी उशिरापर्यंत थांबून कार्यक्रमाचा आनंद घेतला. ‘पुढारी’ वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने हे सारे समाजघटक काही तास एकत्र रमले, दिलखुलास गप्पा झाल्या. अधूनमधून राजकीय टोलेबाजी झाली. यावेळी ‘पुढारी’विषयीचा आदरभाव, निर्भिड पत्रकारितेविषयी असलेला विश्वास, पारदर्शकता, संवेदनशीलतेविषयी असलेली ओढ व नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणाविषयी ‘पुढारी’ सातत्याने घेत असलेली भूमिका मान्यवरांच्या चर्चेतून व्यक्त झाली.

The post 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव! नाशिक आवृत्तीचा 8 वर्धापनदिन अपूर्व उत्साहात appeared first on पुढारी.