पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

nmc www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून महापालिकेतील पेस्ट कंट्रोलचा ठेका वादात सापडलेला आहे. या आधीही या ठेक्याबाबत लोकप्रतिनिधींनी अनेक प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. दोन वर्षांपासून जुन्या ठेक्याची मुदत संपलेली आहे. असे असताना मुदतवाढीच्या नावाखाली जुन्याच ठेकेदाराला चाल दिली जात असल्याने प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित होत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने पेस्ट कंट्रोलचा नवीन ठेका 19 कोटींवरून 46 कोटींपर्यंत गेला होता. तक्रारींनंतर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रिया रद्द केल्याने त्यास ठेकेदाराने न्यायालयात आव्हान दिले होते. त्या आधारे न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. दीड वर्षानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर मनपाने पुन्हा निविदा प्रक्रिया हाती घेतली. तत्कालीन आयुक्तांनी 46 कोटींचा ठेका 33 कोटींवर आणला असून, नवीन निविदा प्रक्रियादेखील मुदतवाढीमुळे वादात सापडली होती. या निविदा प्रक्रियेत सहभागच नसलेल्या एका वादग्रस्त ठेकेदाराची एंट्री आश्चर्य करणारी असून, कागदपत्रांची अपूर्तता असतानाही या ठेकेदाराला मागील दाराने सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. निविदा प्रक्रियेची पडताळणी सुरू असतानाच संबंधित ठेकेदार आणि अतिरिक्त आयुक्त आत्राम व मलेरिया विभागप्रमुख डॉ. त्र्यंबके यांची सुटीच्या दिवसातील भेटही उजेडात आली आहे. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, दोन्ही अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना खुलासा करण्यासाठी सात दिवसांची मुदत आयुक्तांनी दिली आहे. यामुळे ते काय खुलासा सादर करतात याकडे लक्ष लागून आहे. संबंधित दोन्ही अधिकारी फाइल घेऊन शासकीय विश्रामगृहावर गेले होते. दोनपैकी एका अधिकार्‍याने खासगी ठेकेदाराच्या गाडीतून प्रवास करत एका खासगी व्यक्तीच्या घरी भोजन केल्याचे वृत्त आहे.

संबंधित दोन्ही अधिकार्‍यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या कामकाजाची फाइल अशा प्रकारे बाहेर घेऊन जाणे हा गुन्हा आहे. यापुढे असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई होईल आणि घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल. – डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, आयुक्त, मनपा.

हेही वाचा:

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.