महाराष्ट्र आणि गुजरात हद्दीजवळील दुर्गम भागात असलेल्या पेठ तालुक्यातील फणसपाडा पाड्यावर देवकाबाई वाघेरे या आदिवासी महिलेची बातमी “पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांनी फोन करून मदतीची भावना व्यक्त केली.
मागील वर्षी या महिलेचे पती अंबादास वाघेरे यांचा शेवगाच्या शेंगा काढताना तोल गेल्याने खाली पडले व त्यांच्या कंबरेला आणि पायाला जबर मार लागल्याने त्यांनी स्वतः हातात नांगर घेऊन घरगाडा चालवीत आपल्या मुलीचे लग्नदेखील लावून दिले होते. यासाठी तिने कर्जदेखील घेतले होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून उपचार सुरू होतो. या ऑपरेशनमध्ये योजनेतून मिळणारे पाच लाख संपल्याने त्यांनी पैसे नसल्याने घरची वाट धरली होती. आज या घटनेला एक वर्ष झाले तरीदेखील त्यांचा आजार बरा झालेला नाही. पती घरात असल्याने चार लेकरांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी देवकाबाईवर आहे.
पतीच्या अपघातानंतर अनेक संकटे आली. पण मुलांकडे बघत मी संकटांशी लढले. मला योग्यवेळी मदत करणाऱ्या दै. “पुढारी’चे मी आभार मानते. डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन केले आणि कुबड्या मिळाल्याने माझे पती निदान घरात तरी चालू शकतील. आता मुलांना शिकवून माझे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. – देवकाबाई वाघेरे
तिने पतीची वैद्यकीय तपासणी व्हावी आणि पतीला चालण्यासाठी कुबड्या देण्याची विनंती केली होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यावर नाशिक येथील विख्यात डॉक्टर अजय कापडणीस यांनी थेट आदिवासी दुर्गम पाड्यावर जाऊन त्या महिलेच्या पतीची तपासणी केली. तिच्या पतीला त्या अपघातात साठ टक्के अपंगत्व आले आहे. त्यांनी कोणते व्यायाम करावे, आदिवासींच्या योजनादेखील समजून सांगितल्या. तर मर्चंट नेव्हीचे निवृत्त रेडिओ ऑफिसर विजय नागरे यांनी पत्नी नंदिनी यांच्या स्मरणार्थ कुबडी आणि साहित्य उमेशकुमार नागरे यांनी पाड्यावर येऊन दिले. या महिलेचे पती अंबादास हे छान चित्रदेखील काढत असल्याने त्यांना चित्रकलेचे साहित्यदेखील नागरे देणार आहेत. पतीला रोज सकाळी मुलाच्या मदतीने घरातून शेतावर व शेतातून घरी उचलून आणण्याचे काम आता कमी होणार आहे.
सरकारी योजनेनुसार अपंग व्यक्तीला दरमहा पंधराशे रुपये देण्याची योजना आहे. तिचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले. आदिवासी बांधवांसाठी अनेक सरकारी योजना असल्या तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. – डॉ. अजय कापडणीस, नाशिक.
हेही वाचा: