Site icon

पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदार आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने गर्भवतीच्या मातेवरच मुलीची प्रसूती करण्याची वेळ आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. रेखा सोनवणे (कायमस्वरूपी) आणि डॉ. आशिष सोनवणे (कंंत्राटी) अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, रविवारी (दि. ५) सकाळी ९ च्या सुमारास यशोदाबाई त्र्यंबक आव्हाटे (बऱ्याची वाडी) या त्यांची आई सोनाबाई वाळू लचके यांच्यासह पोहोचल्या. रविवार असल्याकारणाने गर्दी कमी होती आणि आरोग्य केंद्राच्या इमारतीचा दरवाजा बंद होता. त्यावेळेस आरोग्य केंद्रात कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. मुलगी यशोदा हिच्या पोटात कळा येत असल्याने आई सोनाबाई यांनी तिला स्वतः लेबर रूममध्ये नेले. तेथे आशासेविकेच्या मदतीने तिची प्रसूती केली. मुलाचे वजन इत्यादी सोपस्कार पूर्ण केले. प्रसूतीनंतर जवळपास अर्धा पाऊण तास गेल्यानंतर आरोग्य केंद्रात सेवेस असलेल्या नर्स तेथे पोहोचल्या. सीईओ मित्तल यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी आता कडक भूमिका घेण्यात येणार आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असे प्रकार घडतील तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार होईल. तसेच त्रिसदस्यीय समिती गठीत करून त्यावर गुन्हेदेखील नोंदविण्यात येतील. आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा टाळण्यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सरप्राइज व्हिजिट, तंत्रज्ञानाचा वापर करत बायोमेट्रिक हजेरी, लोकेशनसह फोटो, ग्रुप फोटो यासोबतच ग्रामस्तरावरील आरोग्य समिती सक्षम करण्यात येणार आहे.

दोन महिन्यांत तिसरे प्रकरण
दोन महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यात चिखलओहोळ आरोग्य केंद्रात हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. दोन आठवड्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. आणि आता अंजनेरी आरोग्य केंद्रात कोणीही उपस्थित नसल्याने हा प्रकार घडला आहे. याबाबत जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर कठोर निर्णय घ्यायला हवा, असा सूर ग्रामीण भागात निघत आहे.

रुग्णवाहिका चालक रजेवर

अंजनेरी प्रकरणात रुग्णवाहिका चालक रीतसर परवानगी घेऊन रजेवर होता. चालक रजेवर असल्यावर त्याचा कार्यभार इतर कोणाकडे द्यायला हवा होता. मात्र तसे न होता, कार्यभार कोणाकडेच दिला गेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचा:

The post पुढारी विशेष : 'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल appeared first on पुढारी.

Exit mobile version