पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व दिसून येत आहे. विद्यापीठाच्या ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ प्राध्यापकांना सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यात शैक्षणिक संस्था, तालुक्यांना प्रतिनिधित्व मिळाले असून, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि ‘मविप्र’ला सर्वाधिक नामांकन मिळाल्याची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी दिली आहे.

अभ्यास मंडळ सदस्यत्वाचा हा कालावधी 5 वर्षांचा असून, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचे झालेले हे नामनिर्देशन अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्या अभ्यासक्रमावर कार्यशाळा आयोजित करणे, परीक्षक नेमणे, पेपर निरीक्षक नेमणे, संशोधनाची पॉलिसी ठरवणे, संदर्भ ग्रंथ निर्माण करणे आदी महत्त्वाची जबाबदारी अभ्यास मंडळ पार पाडत असते. त्यामुळे या अभ्यास मंडळ नामनिर्देशनाला विशेष महत्त्व असते.

नामनिर्देशित सदस्यांचे कुलगुरू कारभारी काळे, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. संजय सोनवणे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी कौतुक केले आहे. तर विद्यापीठ विकास मंचचे समन्वयक आणि विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, एमजीव्हीचे डॉ. अपूर्व हिरे यांच्या सहकार्यामुळेच नाशिकला विक्रमी नामनिर्देशन मिळाल्याने त्यांचे आभार वैद्य यांनी मानले.

संस्थानिहाय सदस्य

मविप्र-१७, एमजीव्ही- १५, व्ही. एन. नाईक- ५, गोखले एज्युकेशन-५, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटी-३, जे. डी. बिटको- ३, नेमिनाथ जैन संस्था-३ तज्ज्ञ प्राध्यापकांना विविध विषयांतील अभ्यास मंडळांवर सदस्यत्व देण्यात आले आहे. तसेच जे.ए. टी (मालेगाव), देवळा कॉलेज, स्वामी मुक्तानंद कॉलेज (येवला), श्री विश्वेश्वरय्या संस्था (सिन्नर), मेट, महिला कॉलेज (नाशिकरोड), मातोश्री कॉलेज (एकलहरे) या संस्थांतील प्रत्येकी १ तज्ज्ञ प्राध्यापकांची अभ्यास मंडळांवर वर्णी लागली आहे.

हेही वाचा :

The post पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व appeared first on पुढारी.