पुणे विद्यापीठ उपकेंद्राला लवकरच मान्‍यता मिळणार; अधिसभा बैठकीत माहिती

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक व नगर उपकेंद्रांसंदर्भात नुकतीच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्‍याशी चर्चा झाली. यासंदर्भातील प्रस्‍तावाला लवकरच शासनाची मान्‍यता प्राप्त होईल. त्‍यानंतर उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी रविवारी (ता. १०) अधिसभा बैठकीत दिली. 

भ्रष्टाचार, पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्‍या विषयावर चर्चा

अधिसभा सदस्‍य प्रा. डॉ. नंदू पवार यांनी यासंदर्भात प्रश्‍न उपस्‍थित केला होता. तर अमित पवार यांनी अंतिम वर्ष परीक्षेत भ्रष्टाचार झाल्‍याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. शनिवार (ता.९) व रविवार (ता.१०) असे दोन दिवस चाललेल्या अधिसभा बैठकीत सदस्‍यांनी सादर केलेल्‍या विविध प्रस्‍तावांवर चर्चा करत मान्‍यता देण्यात आली. उपकेंद्राचा रेंगाळलेला मुद्दा प्रा. डॉ. पवार आणि अमित पाटील यांनी मांडला. सद्यःस्‍थितीत उपकेंद्रासाठी भाडेतत्त्वावरील जागेसाठी मोठी रक्‍कम खर्च होत असून, विद्यापीठाच्‍या उपकेंद्राची लवकरात लवकर उभारणीची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली. उपकेंद्रासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालय व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री कार्यालयाशी संपर्क साधल्‍याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. त्यानंतर कुलगुरूंनी उपकेंद्रासंदर्भात माहिती दिली. ते म्‍हणाले, की दोन दिवसांपूर्वीच नाशिक व नगर उपकेंद्रासंदर्भात बोलणे झाले असून, शासनाची मान्‍यता मिळाल्‍यास तातडीने काम सुरू केले जाईल. त्‍यासाठी विद्यापीठाने निधी राखून ठेवला आहे. 

भ्रष्टाचाराच्‍या मुद्यावर खडाजंगी 

अंतिम वर्ष परीक्षेच्‍या निविदा प्रक्रियेतील त्रुटींसह एकूणच संपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्‍याचा आरोप पाटील यांनी केला. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणीही त्‍यांनी केली. तसेच नवीन महाविद्यालयांना मान्‍यतेसंदर्भात ऑनलाइन अर्ज सादर केल्‍यानंतर कागदपत्रे सादर करतानाच्‍या प्रक्रियेत पैशांची मागणी झाल्‍याचा गंभीर आरोप त्‍यांनी केला. विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे प्रकार गंभीर असल्‍याच्‍या मुद्यावर खडाजंगी झाली. 

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

प्रथमच दोन दिवसांची झालेली अधिसभा बैठक खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडली. सदस्‍यांनी प्रभावीपणे मांडलेल्‍या मुद्यांवर चर्चा करत विद्यापीठाने सदस्‍यांच्‍या प्रस्‍तावांना मान्‍यता देत त्‍यांचा मान राखला. - विजय सोनवणे, अधिसभा सदस्‍य व व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य 

मागील ऑनलाइन अधिसभा बैठकीत सभात्‍याग केल्याची बाब इतिवृत्तात नोंद करण्याची मागणी केली. त्‍यानुसार सुधारणा केल्‍या जाणार आहेत. उपकेंद्राचाही मुद्दा मांडला असून, शासन मान्‍यतेनंतर कामाला सुरवात होणार असल्‍याची माहिती विद्यापीठाने दिली. - प्रा. डॉ. नंदू पवार, अधिसभा सदस्‍य 

अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भातील प्रक्रियेतील भ्रष्टाचार झाला असून, यासंदर्भात चौकशीची मागणी केली. आवाज दाबण्याचा प्रयत्‍न खपविला जाणार नसून, यासंदर्भात पुढेदेखील पाठपुरावा करणार आहे. या मुद्यावर प्रसंगी आंदोलन छेडले जाईल. - अमित पाटील, अधिसभा सदस्‍य  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा