पुरातत्त्व विभागाचे कार्यालयच अनधिकृत! महापालिकेने बजावली नोटीस

नाशिक : पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नाशिक उपमंडळाचे कार्यालय अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. कार्यालयाचे प्रत्यक्ष ठिकाण व पुरातत्त्व विभागाने नगररचना विभागाला केलेल्या खुलाशामध्ये जागांमध्ये तफावत आढळल्याने पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस बजावली आहे. 

पुरातत्त्व विभागाचे कार्यालयच अनधिकृत
दादासाहेब फाळके स्मारकाच्या बाजूला भारतीय पुरातत्त्व संरक्षण विभागाचे नाशिक उपमंडळ कार्यालय आहे. ज्या जागेवर कार्यालय आहे, त्या जागेवर आनंद शिरसाट यांनी मालकीचा दावा आपले सरकार पोर्टलवर करताना पुरातत्त्व विभागाचे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार नोंदविली. पालिकेच्या नगररचना विभागाकडे तक्रार वर्ग झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाला डिसेंबर २०१७ मध्ये नोटीस बजावण्यात आली. जागेच्या मालकीबाबत खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाने खुलासा करताना पाथर्डी शिवारातील सर्व्हे क्रमांक २८५/३/ई/२ मध्ये धर्मराज विकास मंडळाच्या चावडीच्या जागेत मिळकत दर्शविली; परंतु मिळकतीची जागा पाथर्डी शिवारातच अन्य ठिकाणी असल्याचे समोर आली.

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

जागांमध्ये तफावत आढळल्याने महापालिकेकडून नोटीस 

पुरातत्त्व विभागाची मिळकत व दर्शविलेली जागा भिन्न ठिकाणी असल्याने जानेवारी २०१८ मध्ये खुलासा करण्याची दुसरी नोटीस बजावण्यात आली; परंतु त्यानंतर कारवाई झाली नाही. शिरसाट यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून माहिती मागविल्यानंतर कारवाईच्या कागदावरची धूळ झटकली गेली. आता पुन्हा पालिकेच्या नगररचना विभागाने पुरातत्त्व खात्याच्या नाशिक उपमंडळ कार्यालयाला नोटीस बजावत सातबारा उतारा, जागेचा नकाशा, करारनामा प्रत सादर करण्याची सूचना दिली. पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाला देण्यात आलेली नळजोडणीदेखील अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 
 

गेल्या पंचवीस वर्षांपासून पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. जागेच्या मालकी हक्कासंदर्भात पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस पाठविली असून, त्याचा खुलासा केला जाईल. -एच. एम. सुतारिया, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक, नाशिक उपमंडळ