“पुरातत्व’चे लाचखोर डॉ. गर्गे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

लाचखोर तेजस गर्गे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – तक्रारदाराकडून लाच घेण्यास महिला सहकाऱ्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे तत्कालीन संचालक डॉ. तेजस गर्गे यांना उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन दिला आहे. ७ मे रोजी विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती आळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले हाेते. त्यात आळे यांच्याकडून लाचेतील वाटा स्वीकारण्याचे गर्गे यांनी मान्य केल्याचे पुरावे विभागास मिळाल्याने त्यांनी गर्गे विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.

मे महिन्यात संशयित आळे यांनी त्यांच्या घरात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणाच्या सखोल तपासात डॉ. गर्गे यांनी लाचेच्या रकमेतील हिस्सा स्वीकारण्याचे मान्य केले हाेते. त्यामुळे इंदिरानगर पोलिस ठाण्यात आळे व डॉ. गर्गे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच डॉ. गर्गे फरार झाले. जिल्हा न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने डॉ. गर्गे यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा: