पूजा चव्हाणप्रकरणी जात पंचायत सक्रिय; अंनिसच्या जात पंचायत मूठमाती अभियानाचा आक्षेप 

नाशिक : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव संशयित म्हणून घेतले जात असून, त्यांना वाचविण्यासाठी बंजारा समाजाची जात पंचायत सक्रिय झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानातर्फे करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे. 

वनमंत्र्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंजारा समाजात जात पंचायतचे अस्तित्व कायम आहे. त्यासाठी नाईकांच्या बैठका होत आहे, असे गोंडस नाव दिले जात आहे. बंजारा जात पंचायतीत जात पंचांना नाईक म्हणतात. जात पंचायत मूठमाती अभियानाकडे या अगोदर बंजारा जात पंचायतीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या घटनेत जात पंचायतीचा प्रभावी हस्तक्षेप असल्याचे जात पंचायत मूठमाती अभियानाने म्हटले आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

वनमंत्री राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे कोरोनाचे नियम तोडून गर्दी जमवत घेतलेल्या कार्यक्रमाला जात बांधव उपस्थित होते. पत्रकार परिषद इतर ठिकाणी न घेता महंतांच्या जागेत पोहरादेवी येथे घेणे हे समाजबांधवांची साथ व त्यांची मते आपल्या बाजूने राहावीत, यासाठी घेतली गेली. खरेतर पोहरादेवी हे श्रद्धास्थान आहे. न्यायस्थान नाही. त्याचे सत्ताकेंद्र करणे चुकीचे आहे. न्याय व अन्याय ठरविण्याचा आधिकार त्यांना नाही. आपल्या राज्यात जात पंचायतविरोधी कायदा आहे. त्यानुसार कुणालाही समांतर न्याय व्यवस्था चालू करता येत नाही. मंत्री राठोड यांचे कालचे वर्तन जात व जात पंचायत व्यवस्था अधिक घट्ट करणारे आहे. त्यामुळे जात पंचायत मूठमाती अभियानतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले