पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना अद्यापही ‘रेड सिग्नल’च! प्रवाशांचा चारपट अधिक खर्च

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : नोकरीनिमित्त चाकरमान्यांना, तर दुकानाचा माल खरेदीसाठी व्यावसायिकांना मुंबईला पोचविण्यासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना प्रशासनाने अजूनही ‘रेड सिग्नल’ दिलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना पंचवटी एक्स्प्रेसशिवाय दुसरा आधार नाही. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोचण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे. खासगी वाहनांतून प्रवास करताना चारपट अधिक खर्च तर येतोच शिवाय वेळेचा अपव्य होत आहे. यामुळे रेल्वे कधी रुळावर येणार, याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. 

खाजगी वाहनांतून प्रवास करताना दहापट अधिक खर्च 
धावणाऱ्या रेल्वेला कोरोनाने जोरदार ‘ब्रेक’ लावले आहेत. पण टाळेबंदी उठवल्यानंतर सर्व पूर्ववत होताना रेल्वेने अद्याप गती घेतलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील रोज सुमारे दोन हजार नोकरदार, व्यावसायिक मुंबईच्या दिशेने जातात. पण त्यांना इच्छित स्थळी पोचण्यासाठी कमी वेळात, खर्चात व सुरक्षित प्रवास मानल्या जाणाऱ्या रेल्वेने अद्याप पटरी पकडलेली नाही. मनमाडहून निघाणारी पंचवटी एक्स्प्रेस हाच एकमेव आधार आहे. तिकीट आरक्षण केल्याशिवाय पंचवटीतही प्रवेश नाही. त्यामुळे ऐनवेळी मुंबईला जायचे म्हटले, की खासगी महागडा व वेळखाऊ पर्याय निवडावा लागतो. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

राजकीय नेते, लोकप्रतिनिधी या प्रश्‍नावर गप्प

भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-इगतपुरी शटल, गोदावरी व सेवाग्राम अजूनही फलाटावर आलेल्या नाहीत. त्यामुळे खासगी वाहन किंवा बसने मुंबई गाठावी लागत आहे. कामयानी, काशीसह सात रेल्वे रोज नाशिक जिल्ह्यातून जातात. पण न थांबताच प्रवाशांना ‘टाटा’ करून सुटतात. एक्स्प्रेसचे थांबे काढून घेतल्याने त्या रेल्वे असून, नसल्यासारख्याच आहेत. जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानके सुनीसुनी आहेत. त्यामुळे नियमित रेल्वेला कधी ‘ग्रीन सिग्नल’ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंतर रेल्वे प्रवाशांच्या ढीगभर संघटना आहेत. रेल्वेसेवा पूर्ववत करण्यावर त्यांनीही ठोस भूमिका घेतलेली नाही. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी या प्रश्‍नावर गप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांचा जिव्हाळ्याच प्रश्‍न दुर्लक्षितच आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या 
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी येथील स्थानकावरून नित्याने प्रवास करणारे नागरिक रेल्वेअभावी खासगी वाहनांतून मुंबई गाठत असल्याने ते आर्थिक झळ सोसत आहेत. जिल्ह्याच्या नांदगाव या टोकापासून मुंबई रिटर्नच्या प्रवासाला प्रतिव्यक्ती तीनशे रुपयांपेक्षा जास्त खर्च नव्हता. आता तोच खर्च खासगी वाहनाचे इंधन व टोल खर्च पाहता तीन हजार रुपयांपर्यंत होत आहे. नोकरदार, व्यापारी, शेतकरी, भाजीपाला विक्रते, मुंबईला उपचारांसाठी जाणारे रुग्ण यांच्यासाठी न परवडणारा प्रवास खर्च होत आहे. यामुळे ‘आमदनी अठ्ठणी... खर्चा रुपय्या’ अशी त्यांची स्थिती आहे. 
-------चौकट----- 
तुलनात्मक परतीचा प्रवासखर्च... 
वाहन प्रकार मनमाड ते दादर, सीएसटी 
एसटी भाडे ७०० रुपये 
खासगी वाहन ३००० रुपये 
एक्स्प्रेस रेल्वे ३०० रुपये 
-------कोट--------- 
नियमित रेल्वे सुरू नसल्याने नोकरदार व व्यावसायिकांची होरपळ होत आहे. मुंबईत खरेदी केलेला माल रेल्वेअभावी आणता येत नाही. खासगी वाहनांचा खर्च न परवडणारा आहे. रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. 
-नितीन लोढा, व्यावसायिक, पिंपळगाव बसवंत 
-------कोट------- 
रेल्वेच्या सर्व गाड्या पूर्ववत करण्यासाठी यापूर्वीच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कामायानी व काशी एक्स्प्रेसला नाशिक जिल्ह्यात थांबे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
- डॉ. भारती पवार, खासदार