पेट्रोलचे दर अब की बार सौ पार! सर्वसामान्य नागरिक हैराण

नाशिक : पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा गुरुवारी (ता. ११) वाढ झाल्याने शहरात साधारण पेट्रोल दर अधिक वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहे. इंधन दरवाढीचा हा टप्पा ऐतिहासिक ठरण्यास अवघे काही दिवस राहिले असले तरी पॉवर, स्पीड पेट्रोल येत्या दोन-तीन दिवसांत शंभरी पार करण्याची शक्यता आहे, तर काही कंपन्यांचे दर शंभरी पार गेल्याने दरवाढीचा नवा विक्रम कोठपर्यंत थांबतो याकडे सर्वसामान्य आशेने पाहत आहेत. 

पेट्रोलचे दर अब की बार सौ पार!
मागील वर्ष कोरोना संसर्गामुळे लोकांच्या लक्षात कायम राहणार आहे. या वर्षात इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या लक्षात राहतील अशी स्थिती आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या नवीन दरांमध्ये ९८.१४ रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला. शंभरी गाठण्यासाठी अवघा १.८६ रुपयांचा फरक राहिल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल या कंपन्यांच्या स्पीड, पॉवर पेट्रोलचा दर सर्वसाधारण पेट्रोलपेक्षा एक ते दीड रुपयाने अधिक आहे. येत्या एक-दोन दिवसांत या पेट्रोलचे दरदेखील शंभरी गाठणार आहेत. 

शेलचे पॉवर पेट्रोल १०१ रुपये 
शेल कंपनीच्या पॉवर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडत १०१ रुपये प्रतिलिटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शहरात दीडशेहून अधिक पेट्रोलपंप आहेत. आतापर्यंत इंधन भरण्यापुरते पंपांकडे पाहिले जात होते; परंतु वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे बेजार झालेले नागरिक आशाळभूत नजरेने पंपांकडे पाहत आहेत. इंधन दरवाढीचा संबंध महागाईशी असल्याने दरवाढ थांबण्याची वाट नागरिक पाहत आहेत. इंधनाबरोबरच वीजदरवाढ व इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट महाग होत असल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तूदेखील तेवढ्याच वेगाने महागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

फेब्रुवारीत असे वाढले दर 
१ फेब्रुवारीला शहरात ९६.९६ रुपये प्रतिलिटर सर्वसाधारण पेट्रोलचा दर होता. ४ फेब्रुवारीला ९६.९६ प्रतिलिटर दर होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारीला ९७.२५ रुपये दर राहिला. ७ फेब्रुवारीला ९७.२८ रुपये, ९ फेब्रुवारीला ९७.९१, तर १० फेब्रुवारीला ९७.९० रुपये प्रतिलिटर, तर ११ फेब्रुवारीला सायंकाळी सहाला जाहीर झालेल्या नवीन दरपत्रकानुसार ९८.१४ रुपये प्रतिलिटर पेट्रोल झाले. प्रतिलिटर शंभरी गाठण्यासाठी १.८६ रुपये एवढाच फरक राहिला आहे.-----------

 हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी