पेट्रोल दरवाढीमुळे नाशिककरांची ई-बाइक्सला पसंती; महिन्यात सहाशे बाइक्सची विक्री

नाशिक  : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात असल्या, तरी भारतात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहे. भविष्यातही पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत राहणार असल्याची चिन्हे असल्याने नागरिकांचा ओढा ई-बाइक्स खरेदीकडे वाढला असून, शहरात गेल्या दोन महिन्यांत सरासरी दररोज ५० इलेक्ट्रॉनिक्स बाइकची विक्री होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सहाशेहून अधिक ई-बाइक्स रस्त्यावर उतरल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. 

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. राज्य परिवहन महामंडळाकडून महापालिकेकडे बससेवा हस्तांतरित होत असल्याने तुरळक बस रस्त्यावर धावतात. वीस लाख लोकसंख्येला साधारण १४० बस पुरविण्यात आल्या आहेत. एका बसमध्ये साधारण ५० ते ५५ प्रवासी बसतात. याचाच अर्थ फारतर दिवसभरात दहा हजार प्रवासी प्रवास करतात. शहर बससेवेव्यतिरिक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुसरी सोय नाही. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला यावरच प्रवास अवलंबून असतो. मात्र, त्या सुविधा महागड्या असल्याने खासगी वाहन खरेदीकडे नाशिककरांचा कल वाढला आहे.

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

सद्यःस्थितीत शहरात अडीच लाखांहून अधिक दुचाकी रस्त्यावर धावतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुचाकी रस्त्यावर उतरल्यानंतर पार्किंग, वाहतूक ठप्प होणे, ध्वनी व वायुप्रदूषण वाढण्याच्या या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात आता पेट्रोल दरवाढीची समस्या निर्माण झाली आहे. शंभर रुपये प्रतिलिटरपर्यंत पेट्रोलचे भाव पोचल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यातून ई-बाइक्स खरेदीकडे कल वाढला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत ई-बाइक्स खरेदीकडे कल वाढला आहे. शहरात १२ ई-बाइक्सचे शोरूम असून, एका शोरूममधून रोज चार ते पाच ई-बाइक्स विकल्या जात आहेत. मासिक सरासरी सहाशे बाइक्स महिन्याला विकल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. 
 
ई-बाइक्सची वैशिष्ट्ये 

-पेट्रोलऐवजी बॅटरीवर चालणार. 
-बॅटरीच्या गुणवत्तेनुसार ५० ते १०० किलोमीटर धाव. 
-बॅटरी चार्जिंगसाठी सहा ते सात रुपये खर्च. 
-आरटीओ नोंदणी, परवाना, प्लग, कॉर्बोरेटर, इंजिन, ऑइलची गरज नाही. 
-देखभाल खर्च नाही. 
-२५ हजार किलोमीटर चालण्याची क्षमता. 
-प्रदूषणमुक्त, आवाजविरहित गाडी व कर्ज उपलब्ध. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना